राज्यातील सर्व वयोगटातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण त्वरित करावे !

राज ठाकरे यांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी

राज ठाकरे

मुंबई – ‘रेमडेसिविर’ आणि ‘ऑक्सिजन’ यांचा पुरेसा पुरवठा असावा, यासाठी राज्याला आवश्यक ती पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी. महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल, तर सर्व वयोगटातील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवे, त्यासाठी राज्याला आवश्यक ती पावले उचलण्याची मोकळीक द्यावी, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, कोरोनाची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी यांमुळे महाराष्ट्रातील नागरिकांची अतोनात हानी झाली आहे. याचे आर्थिक आणि सामाजिक पडसाद देशभर उमटले आहेत. स्थानिक परिस्थितीला अनुसरून उपाययोजना आखण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन द्या. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बिकट आहे. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, दळणवळण बंदी घोषित करणे, हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करून द्यावी. ‘हाफकीन’ आणि ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक’ यांना लस उत्पादन करण्याची अनुमती द्यावी. या सर्व सूचना तुम्ही सकारात्मक दृष्टीने पहाल आणि प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षा नव्हे निश्‍चिती आहे.