रायगड आणि नवी मुंबई येथेही बलीदान मास साजरा
मुंबई, १४ एप्रिल (वार्ता.) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मुंबईतील दहिसर आणि शीव येथे, तर ठाणे येथील वामनराव ओक रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताची आवश्यकता असतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने राबवण्यात आलेला हा समाजोपयोगी उपक्रम कौतुकास्पद ठरला. रायगड येथे पेण आणि पनवेल या ठिकाणीही नियमित बलीदान मास पाळण्यात आला.
दहिसर येथील शिबिरात १०२, तर शीव येथील उपक्रमात ९२ जणांनी रक्तदान केले. दहिसर येथील रक्तदान शिबिरात बाल मित्र मंडळ आणि श्री गणेश बाल मित्र मंडळ यांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. या ठिकाणी प्रतिष्ठित डॉ. रवींद्र मराठे यांनीही रक्तदान केले. या उपक्रमासाठी रायगड शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत जोरकर आणि सह्याद्री फार्म्स आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आबासाहेब काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश लखमजे यांची उपस्थिती या वेळी लाभली. या शिबिरासाठी श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी श्री. अनिकेत सावंत यांसह अन्य धारकर्यांनी विशेष प्रयत्न केले. शीव येथील रक्तदान शिबिर श्री. मंगेश केणी यांच्या नेतृत्वाखाली धारकर्यांनी यशस्वीपणे पार पाडले. ठाणे येथील रक्तदान शिबिर श्री. स्वप्नील दानवले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
नवी मुंबई येथील बालकांचा भ्रमणभाषमध्ये वेळ वाया घालवणारे ‘अॅप्स’ न ठेवण्याचा निर्णय !
नवी मुंबई येथील बालकांचा स्तुत्य निर्णय ! यांचा आदर्श सर्वत्रच्या बालकांनी घ्यावा !
नवी मुंबई येथे कोपरखैरणे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून श्री. अजय बर्गे यांच्या नेतृत्वाखाली नियमित बलीदान मास साजरा करण्यात आला. या वेळी सर्वांनी प्रतिदिन हिंदवी स्वराज्याचा इतिहास, श्लोक, अभंग, भक्तीगीते यांचे पाठांतर केले. काही मुलामुलींनी स्वतः सिद्धता करत व्याख्याने दिली. बलीदान मासाचे पालन म्हणून २४ बालकांनी मुंडण करवून घेतले. विशेष म्हणजे धर्मकार्यासाठी त्यागाची भावना रूजावी, यासाठी वेळ वाया घालवणारे भ्रमणभाषमधील चिनी अॅप्स, वेळ वाया घालवणारे ‘ऑनलाईन गेम’ काढून टाकून भ्रमणभाषमधील मनोरंजनपर साहित्य न ठेवण्याचा निश्चय या बालकांनी केला. त्याऐवजी नियमित मैदानी खेळ शिकण्याचा निर्धार बालकांनी केला.