हरिद्वार, ११ एप्रिल (वार्ता.) सरकारने पुजार्यांची भूमी हडप केली आहे. याविषयी आवाज उठवल्यावर माझीच पिळवणूक करण्यात आली. आज भगव्या पोशाखात लोक भीक मागून भगवा आणि साधू यांची प्रतिष्ठा अल्प करत आहेत. यांसह अन्य काही विषयांवर आपल्याला कार्य करावे लागेल. हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी मी तुमच्यासह आहे, असे मार्गदर्शन मध्यप्रदेश ब्यावरा-राजगडचे महामंडलेश्वर स्वामी रामदेव महाराज यांनी येथे केले. हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या संपर्क अभियानाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
या वेळी श्री. जाखोटिया यांनी स्वामी रामदेव महाराज यांना समिती करत असलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, लव्ह जिहाद आणि गोहत्या यांविषयी स्वामी रामदेव महाराज यांविषयी समिती करत असलेले कार्य याविषयीही माहिती दिली. त्यांना कुंभमेळ्यामध्ये धर्म आणि राष्ट्र यांच्या संदर्भातील चित्रमय प्रदर्शन असलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचेही निमंत्रणही दिले. या वेळी समितीचे श्री. राजेश उमराणी उपस्थित होते.