कपड्यांवरील सात्विक, राजसिक आणि तामसिक वेलविणींमधून (नक्षींमधून) प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम

कपड्यांविषयी नाविन्यपूर्ण अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘प्रत्येक वस्तूला तिच्या गुणधर्माप्रमाणे चांगली किंवा वाईट स्पंदने असतात. आपल्या अवतीभोवती आणि वापरात असलेल्या अनेक वस्तूंच्या स्पंदनांचा आपल्यावर सतत परिणाम होत असल्यामुळे त्या वस्तू सत्वप्रधान असणे आवश्यक असते. अन्य कोणत्याही वस्तूंपेक्षा अंगावरच्या कपड्यांचा आणि आपला निकटचा संबंध असतो. कापडाचा प्रकार, रंग, कापडावरील वेलवीण (नक्षी) आणि कपड्याची शिलाई यांवर त्या कपड्याची सात्विकता अवलंबून असते. आजकालची तरुण पिढी ‘फॅशन’च्या नावाखाली चित्रविचित्र आकृत्या असलेले, चटेरीपटेरी रंगांचे, जीन्स-स्ट्रेचेबल्स यांसारखे तोकडे आणि घट्ट बसणारे अशा नाना प्रकाराचे कपडे वापरते. ही सर्व विकृत वेशभूषा आहे. विकृत वेशभूषा म्हणजे रज-तमात्मक स्पंदने निर्माण करणारी वेशभूषा. अशा वेशभूषेमुळे मनुष्याची बुद्धी विकृत बनते. तो नाना दुष्प्रवृत्तींचा गुलाम बनतो, काम-क्रोधादी षड्रिपूंच्या अधीन होतो आणि वाईट शक्तींच्या आक्रमणांना बळी पडतो. याउलट मनुष्याने सात्विक कपडे घातल्याने त्याला ईश्‍वरी चैतन्य ग्रहण करता आल्यामुळे त्याचे मन आणि बुद्धी सात्विक होतात. तो सदाचरणी आणि विवेकी बनतो, तसेच त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासही साहाय्य होते.

​‘कपड्यांवरील सात्विक, राजसिक आणि तामसिक वेलविणींमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १६.३.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

​या चाचणीत कपड्यांवरील सात्विक वेलवीण, राजसिक वेलवीण आणि तामसिक वेलवीण यांची रंगीत संगणकीय प्रत (कलर प्रिंटस्) काढून त्यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. सात्विक आणि राजसिक वेलविणींमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ अ २. तामसिक वेलविणीमध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा असणे : तामसिक वेलविणीमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा होत्या अन् त्यांच्या प्रभावळी अनुक्रमे ७.५१ मीटर आणि ६.३४ मीटर होत्या.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. राजसिक वेलविणीच्या तुलनेत सात्विक वेलविणीमध्ये पुष्कळ अधिक सकारात्मक ऊर्जा असणे : सात्विक आणि राजसिक वेलविणींमध्ये सकारात्मक ऊर्जा होती अन् त्यांच्या प्रभावळी अनुक्रमे ५.४६ मीटर आणि १.४० मीटर होत्या, म्हणजे राजसिक वेलविणीपेक्षा सात्विक वेलविणीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ४.०६ मीटरने अधिक होती.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२ आ २. तामसिक वेलविणीमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन : सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

टीप – एकूण प्रभावळ (ऑरा) : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा नमुना म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची एकूण प्रभावळ मोजतात.

२ इ १. चाचणीतील घटकांची एकूण प्रभावळ

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ‘३’ मध्ये दिले आहे.

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

डॉ. अमित भोसले

३ अ. राजसिक वेलविणीच्या तुलनेत सात्विक वेलविणीतून पुष्कळ अधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : चाचणीतील राजसिक वेलविणीच्या तुलेनत सात्विक वेलविण पुष्कळ अधिक सात्विक आहे. सात्विक वेलविणीत निळ्या रंगाच्या एकसारख्या पार्श्‍वभूमीवर (प्लेन बॅकग्राऊंडवर) पांढर्‍या रंगाची लहान आणि सारख्याच आकाराची कोमल (नाजूक) फुले आहेत; तसेच त्यांची रचना सुटसुटीत आहे. त्यामुळे सात्विक वेलविणीतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. याउलट राजसिक वेलविणीत गुलाबी रंगाच्या छटांमध्ये लहान-मोठ्या आकाराची फुले आणि तपकिरी रंगाची टोकदार पाने आहेत; तसेच त्यांची रचना सुटसुटीत नसून एकमेकांच्या पुष्कळ जवळ आहे. त्यामुळे राजसिक वेलविणीतून अल्प प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. ‘कपड्यांवरील वेलवीण सात्विकतेच्या दृष्टीने कशी असावी ?’, हे पुढे दिले आहे.

१. वेलवीण अर्थहीन नसावी : कपड्यांवरची वेलवीण निवडतांना ती अर्थपूर्ण असावी, उदा. ठिपके, पाने, फुले आणि वेली.

२. वेलवीणचा आकार फार मोठा नसावा.

३. अणकुचीदार टोके असलेली वेलवीण नसावी : पानाफुलांची वेलवीण निवडतांना अणुकूचीदार टोके असलेली पानेफुले नसावीत. वेलवीण कोमल (नाजूक) आणि आकर्षक असावी.

४. वेलवीण पुष्कळ जवळ जवळ नसावी : वेलवीण पुष्कळ जवळ जवळ असल्यास त्या वेलविणींमधून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात. आकाराने चांगली वेलवीणही एकमेकांच्या पुष्कळ जवळ असेल, तर त्रासदायक स्पंदने निर्माण करते. वेलवीण जेवढी सुटसुटीत असेल, तेवढी ती निर्गुण तत्त्वाकडे जाणारी असते आणि तिच्यातून चांगली स्पंदने येतात.

५. रंगांच्या छटांनुसार त्यांच्यामधील सगुण किंवा निर्गुण तत्त्व पालटणे : रंगांच्या छटांनुसार त्यांच्यामध्ये सगुण किंवा निर्गुण यांपैकी कोणते तत्त्व अधिक आहे, हे ठरते. एखाद्या रंगात पांढर्‍या रंगाचे प्रमाण वाढत गेल्यास त्या रंगामध्ये निर्गुण तत्त्वाचे प्रमाण वाढते. एखाद्या रंगामध्ये काळा रंग मिसळला असता त्या रंगामध्ये त्रासदायक स्पंदने आकृष्ट होतात.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’)

३ आ. तामसिक वेलविणीतून पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे कारण : चाचणीतील तामसिक वेलविणीत काळ्या रंगाच्या पार्श्‍वभूमीवर लहान-मोठ्या आकारांतील कवट्यांच्या आकृत्या आहेत. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. यानुसार कोमल टवटवीत फूल पाहिल्यावर मनाला आनंद जाणवतो; याउलट कवटीच्या आकृतीकडे पाहून मनात भय निर्माण होऊन अस्वस्थता जाणवते. फुलांमधून आनंदाची, तर कवट्यांमधून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात. चाचणीतील तामसिक वेलविण अतिशय तमप्रधान असल्याने तिच्यातून पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

४. कलियुगात वेलवीण (नक्षी) म्हणून चित्रविचित्र आकृत्यांचा होणारा वापर मनुष्यजिवास घातक !

​‘आजकाल कलियुगात विविध प्राण्यांच्या आकृत्या असलेले कपडे, भयानक भुतांचे तोंडावळे (चेहरे) असलेले कपडे, विविध ठिकाणी फाटल्यासारखी वेलवीण असलेले कपडे इत्यादी सर्रास पहायला मिळतात. अशा कपड्यांच्या आकृतीबंधात घनीभूत झालेल्या त्रासदायक लहरी कालांतराने जिवाच्या वृत्तीवर परिणाम करतात. असे चित्रविचित्र कपडे परिधान करणारा जीव कालांतराने तमोगुणी बनतो.’ – (श्रीचित्‌‌शक्ति) सौ. अंजली गाडगीळ

​थोडक्यात सात्विकतेच्या दृष्टीकोनातून कपडे निवडतांना आपल्या आवडी-निवडीपेक्षा स्पंदनशास्त्राचा अभ्यास केल्यास आपल्याला अधिक आध्यात्मिक लाभ होतो. कपडे सत्वप्रधान असल्यास त्या कपड्यात सात्विक स्पंदने येऊन ते परिधान करणार्‍या व्यक्तीला सात्विकता आणि ईश्‍वरी चैतन्य यांचा लाभ होतो.’          ​

– डॉ. अमित भोसले, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (४.४.२०२०)

ई-मेल : [email protected]

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक