अमरावती – गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात तापमान ४३.५ अंशापर्यंत नोंदवले गेले आहे. अकोला जिल्ह्यात तापमान ४२.५ अंश आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिक उकाड्याने त्रस्त्र आहेत. असे असले, तरी ८ ते ११ एप्रिलपर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, अशी माहिती येथील हवामान विभागाचे तज्ञ डॉ. अनिल बंड यांनी दिली. अवकाळी पावसामुळे कांदा आणि गहू या पिकांच्या हानीची शक्यता वर्तवली असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
जम्मू-काश्मीरवर येत असलेले पश्चिमी, तर राजस्थान आणि तमिळनाडू यांच्यावर येत असलेले चक्राकार वारे यांच्या प्रभावामुळे विदर्भात पाऊस पडणार आहे. ११ एप्रिलनंतर विदर्भात पुन्हा कडाक्याचे ऊन पडले. २० एप्रिलनंतर विदर्भातील तापमान ४२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता डॉ. बंड यांनी व्यक्त केली.