सासवड शहरातील पालखीतळावर भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी ! 

सामाजिक अंतर पाळण्याचा फज्जा !

जनतेच्या अशा वागण्यानेच कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत नाही. अशाने दळणवळण बंदी अपरिहार्य होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने नियम मोडणार्‍यांना कठोर शिक्षा करण्याचे धोरण त्वरित अवलंबावे असेच सूज्ञ नागरिकांना वाटते.

पुरंदर (जिल्हा पुणे) – सासवडमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; पण त्याचे गांभीर्य प्रशासन आणि जनता या दोघांनाही नाही, असे चित्र दिसून येत आहे. व्यापारी संघटनेने एकत्रित येत पुढाकाराने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला; मात्र जनता कर्फ्यू लागू होणार म्हणून नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने संचारबंदी चालू होण्याआधी हवी तेवढी गर्दी करा, असा अर्थ नागरिकांनी त्यातून काढल्याचे दिसत आहे. ही गर्दी सासवड नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर होती तरीही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकारामुळे सासवडमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.