एकाच दिवशी ४ लाख ६२ सहस्र नागरिकांना कोरोनाची लस देऊन महाराष्ट्राचा राष्ट्रीय विक्रम !

मुंबई – महाराष्ट्रात ३ एप्रिल या दिवशी ४ लाख ६२ सहस्र ७३५ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचा हा राष्ट्रीय विक्रम ठरला आहे. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांना मागे टाकून महाराष्ट्राने आतापर्यंत ७३ लाख ४७ सहस्र ४२९ जणांना कोरोनावरील लस दिली आहे.

याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी केली आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला ६ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल.’’