भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करून कोरोनाचे नियम धाब्यावर
आमदार भारत भालके यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला म्हणून त्यांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी असे वक्तव्य करणे, हे अतिशय गंभीर आणि असंवेदनशील आहे. असे लोकप्रतिनिधी समाजाला योग्य दिशा देऊ शकतील का ?, असा विचार सामान्यांच्या मनात आल्यास चूक ते काय ?
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – ‘जगात कोरोना नाही, असे वाटत असल्याने मी मास्क काढून बोलत आहे’, असे दायित्वशून्य वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी जयंत पाटील रांजनी (तालुका पंढरपूर) येथे आले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, भगिरथ भालके यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यात कठोर निर्बंध करण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात दुकानदार, सामान्य नागरिक, वारकरी यांच्यावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले गेले. हे सर्व निर्बंध वारकर्यांसह सामान्यांनी प्रशासनास सहकार्य म्हणून पाळले. याउलट राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी कोरोनाविषयीच्या नियमांची उघडउघड पायमल्ली करत आहेत. कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी पोलीस प्रशासन सामान्यांना दंड आकारते. आता राजकीय व्यक्तींकडूनही दंड वसूल करणार का ? राजकीय व्यक्ती सोडून केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच नियम आहेत का ?, असा प्रश्न सामान्यांच्या मनात उपस्थित झाल्यास नवल ते काय ? – संपादक)