|
मुंबई, ३ एप्रिल (वार्ता.) – मुंबईत कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे. बस, रेल्वे, बाजार, मॉल यांमध्ये नागरिकांची गर्दी प्रचंड वाढत असल्याने या ठिकाणी सामाजिक अंतर राखणे अशक्यप्राय होत आहे. मागील आठवडाभरात मुंबईमध्ये कोरोनाचे ४६ सहस्र ५६४ रुग्ण आढळले असून ९५ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २६ मार्च या दिवशी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ६८ दिवस इतका होता, तो २ एप्रिल या दिवशी ४६ दिवस इतका अल्प झाला आहे. केवळ ८ दिवसांत मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग २२ दिवसांनी खाली आला आहे. मुंबईसाठी ही अतिशय धोक्याची घंटा असून प्रशासनाला निर्बंध कडक करण्यावाचून आता कोणताही पर्याय राहिलेला नाही.
मुंबईतील गर्दीवर नियंत्रण राखणे आता प्रशासनाच्या हाताच्या बाहेर गेले आहे. दुपारचा काही कालावधी सोडला, तर मुंबईतील लोकल रेल्वेगाड्यांमध्ये सकाळी ५ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सकाळी कामावर जाण्याच्या आणि सायंकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळेत बेस्टच्या गाड्या प्रवाशांनी खचाखच भरून येत आहेत. दादर येथील भाजीमार्केट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील क्रॉफर्ड मार्केट, भेंडीबाजार आदी ठिकाणी नागरिकांची पूर्वीप्रमाणे प्रचंड गर्दी चालू झाली आहे. चिंतेची गोष्ट म्हणजे या गर्दीमध्ये अनेक नागरिक तोंडावरील मास्क खाली करून वावरतांना आढळतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखणे, या नियमाचा तर मुंबईमध्ये पुरता बट्टयाबोळ झाला आहे. ही सर्व चिन्हे येत्या काही दिवसांत मुंबईला पुन्हा धोकादायक स्थितीत नेणारी आहेत.
धारावी, दादर आणि माहीम येथे कोरोनाचा वेगाने संसर्ग
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पुष्कळ प्रयत्नांनी धारावी झोपडपट्टीतील कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडून कोरोनावर नियंत्रण मिळवले होते; मात्र या झोपडपट्टीत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत आहे. २५ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत धारावीमध्ये ५२७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या या भागात कोरोनाच्या संसर्गाचा वेग असाच राहिल्यास तो नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेसाठी मोठे कठीण काम ठरेल. यासह दादर आणि माहीम येथेही कोरोनाचा वेग झपाट्याने वाढत आहे. मागील आठवडाभरात दादर येथे ६८१, तर माहीम येथे ७९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
मुंबईतील ६५७ इमारती सीलबंद, तर ७० ठिकाणे प्रतिबंधात्मक क्षेत्रे घोषित
२ एप्रिलच्या आकडेवारीनुसार मुंबईतील झोपडपट्टया आणि चाळी येथील ७० ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्रे (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आली आहेत, तर एकूण ६५७ इमारती सीलबंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या शेवटच्या २४ घंट्यांमध्ये संपर्कात आलेले आणि ज्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे, अशा २८ सहस्र ३३७ नागरिकांची नोंद आहे.