सांगली – १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी कोरोना लसीकरण चालू केले आहे. जिल्ह्यात १११ आरोग्य केंद्रांवरून लसीकरण चालू असून त्यात ११६ लसीकरण केंद्रांची भर पडली आहे. पुढील १५ ते २० दिवसांचा कालावधी हा कोरोना संसर्गाच्या दृष्टीने संवेदनशील असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ४५ वर्षांवरील ६ लाख ३० सहस्र नागरिक असून या सर्वांच्या लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्नशील आहेच. मास्क न वापरणार्या आणि कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर मार्चअखेर ४० लाख ९० सहस्र रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्देशित करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा.’’