मुंबई – राज्यात कोरोनाविषयक निर्बंध कठोर करण्यात येणार आहेत. तूर्तास दळणवळण बंदीचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. राज्यात २ एप्रिलनंतर दळणवळण बंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी फेटाळून लावली.
या वेळी राजेश टोपे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आपल्याला दळणवळण बंदी करावी लागली, तरी कोणत्या क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो, याविषयी चर्चा झाली. गर्दी टाळण्यासाठी निर्बंध कठोर करण्यात येणार आहेत. दळणवळण बंदीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील; मात्र चर्चा दळणवळण बंदीच्या दिशेने आहे. संसर्गाची संख्या वाढली, तर दळणवळण बंदीविना पर्याय नसतो. अनेक देश अशी परिस्थिती आल्यास दळणवळण बंदी करतात.’’