परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेले आणि सर्व साधकांवर प्रीती करणारे पू. जयराम जोशी !

फाल्गुन पौर्णिमा (२८.३.२०२१) या दिवशी पू. जयराम जोशीआजोबा यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांची नात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. ऐश्‍वर्या हिने लिहिलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.                               

पू. जयराम जोशीआजोबा

३० मार्च या दिवशी आपण पू. आबांच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या भावाची काही उदाहरणे पाहिली. आज या लेखमालिकेतील उर्वरित भाग पाहूया.    

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/464043.html

(भाग ३)

कु. ऐश्‍वर्या जोशी

१३. पू. आबांमध्ये झालेले पालट

१३ अ. नातीविना राहू न शकणारे पू. आबा नात ३ – ४  मास दूर असतांना ‘देव मायेतून अलिप्त रहायला शिकवत आहे’, असा विचार करून स्थिर रहाणे : मी लहानपणापासून पू. आबांशिवाय राहिले नाही. कुठेही जायचे असले, तरीही मी आणि पू. आबा एकत्र जायचो. पू. आबांनाही माझ्याशिवाय करमत नसे. माझी दहावीची परीक्षा झाल्यानंतर मी काही दिवसांसाठी माझ्या आजोळी रहायला गेले. काही कारणांमुळे मला पू. आबांपासून साधारण ३ – ४  मास दूर रहावे लागले. तेव्हा पू. आबा मला म्हणाले, ‘‘हे देवाचेच नियोजन आहे. तो आपल्याला मायेतून अलिप्त रहायला शिकवत आहे.’’ यापूर्वी मी ४ दिवस कुठे गावी गेले, तरी पू. आबा मला लगेच परत बोलवायचे आणि आता ३ – ४ मास मी दूर राहूनही ते एवढे स्थिर कसे काय आहेत ? पू. आबांनी ‘ही देवाची इच्छा’, असे समजून परिस्थिती स्वीकारली. ते आनंदी होते.

१३ आ. केवळ ‘नात आणि आजोबा’, असे नाते नसून आता ‘गुरु आणि शिष्य’ असे नाते निर्माण होत असल्याचे जाणवणे

१३ आ १. पूर्वी चुका झाल्यावर भावनिक स्तरावर हाताळणे : पूर्वी माझ्याकडून चुका झाल्या की, मी रडायचे. तेव्हा पू. आबा माझे सांत्वन करायचे आणि मला शांत करायचे. तेव्हा ते मला भावनिक स्तरावर हाताळायचे.

१३ आ २. आता चुकांची तत्त्वनिष्ठतेने जाणीव करून देऊन सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे : आता माझ्याकडून चुका झाल्या की, पू. आबा मला त्यांची जाणीव करून देतात. ‘माझ्यात भावनाशीलता हा स्वभावदोष प्रबळ आहे’, याची ते मला वेळोवेळी जाणीव करून देतात. पू. आबा आता मला सांगतात, ‘‘झालेल्या चुकांची स्वतःला खंत वाटली पाहिजे. त्यासाठी वेळोवेळी गुरुदेवांकडे क्षमायाचना केली पाहिजे आणि ती चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत.’’ पू. आबांनी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडून कृती होत नसेल, तर ते मला प्रायश्‍चित्तही घ्यायला सांगतात. आता ते तत्त्वनिष्ठतेने मला माझ्या चुका दाखवून देतात आणि त्यावर मात करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यामुळे आता आमच्यामध्ये केवळ ‘नात आणि आजोबा’, असे नाते नसून आता ते ‘गुरु आणि शिष्य’ असे नाते निर्माण होत आहे’, असे मला जाणवते. ‘पू. आबा म्हणजे ‘माझे परमपूज्य आहेत’, असे मला जाणवते.

१४. एखाद्याने आपले कौतुक केले, तर ‘त्याचे कर्तेपण गुरूंच्या चरणी अर्पण कसे करायचे ?’, याविषयी पू. जोशीआबांनी केलेले मौलिक मार्गदर्शन !

१४ अ. साधकांनी एका सेवेचे कौतुक केल्यावर ‘गुरूंनी सर्व केले असून तू केवळ माध्यम आहेस’, याची जाणीव करून देणे : काही मासांंपूर्वी देवाच्या कृपेने मला बालसंस्कारवर्ग घेण्याची संधी मिळाली. काही बालसंस्कारवर्ग घेतल्यानंतर उत्तरदायी साधक आणि आश्रमातील साधक यांनी माझे कौतुक केले. तेव्हा मला पू. आबांनी सांगितले, ‘‘तुला ही बालसंस्कारवर्ग घेण्याची सेवा गुरुदेवांनी दिली. हा बालसंस्कारवर्ग घेण्यासाठी तुला विषय गुरुदेव सुचवतात. त्याप्रमाणे त्या विषयाचे लिखाणही तेच करून घेतात आणि तुझ्या माध्यमातून प्रत्यक्ष परात्पर गुरुदेव बोलत असतात, तर ‘तू बालसंस्कारवर्ग घेतेस’,  असे कुठे झाले का ? ‘आपल्याकडून प्रत्येक कृती गुरुदेवच करवून घेतात. आपण कठपुतळीप्रमाणे एक माध्यम असतो. या सेवेतून गुरुदेव आपली साधना करून घेतात’, हे नेहमी लक्षात ठेव. कुणी कितीही कौतुक केले, तरीही नेहमी ‘देवच करून घेतो’, हेच मनावर बिंबवायचे.’’

१४ आ. अहं वाढल्यामुळे होणारे दुष्परिणाम : सेवा करतांना आपला अहं वाढू नये. आपले पाय नेहमी जमिनीवर राहिले पाहिजेत. एकदा अहं वाढला आणि जमिनीवरून पाय उचलले गेले की, नंतर अहंची भावना एवढी वाढत जाते की, आपला कर्तेपणा वाढत आहे, हेही आपल्याला कळत नाही. मग आपल्याकडून चुका व्हायला लागतात आणि तेव्हा आपण परत जमिनीवर येऊन आपटतो. या चुकांमुळे आपण स्वतःच्या समवेत समष्टीचीही हानी करतो. असा अहं आपण का बाळगायचा ? जे आपण केलेच नाही, त्याचे श्रेय आपण का घ्यायचे ? अहं वाढल्यावर आपली साधना व्यय होते आणि आपण गुरुदेवांना दुखावतो.

अशी पू. आबा मला वारंवार जाणीव करून देतात आणि त्यांच्यामुळे मला कर्तेपणा देवाच्या चरणी कसा अर्पण करायचा, हे शिकायला मिळते.

१५. अनुभूती

१५ अ. पू. आबांकडे पाहिल्यावर आनंद होणे आणि त्यांच्या दृष्टीतून प्रेमाचा वर्षाव होत असल्याचे जाणवणे : पू. आबा देवपूजा करत असतील, दैनिक वाचत असतील, विश्रांती घेत असतील किंवा कोणतीही कृती करत असतांना त्यांच्याकडे पाहिले, तरी मला फार आनंद होतो.

पू. आबांना लांबून पाहिले, तर ‘कधी एकदा त्यांच्या जवळ जाते’, असे मला होते. पू. आबांनी काही न बोलता नुसते माझ्याकडे पाहिले, तरी ‘ते डोळ्यांतून काहीतरी सांगत आहेत. त्यांच्या दृष्टीतून प्रेमाचा वर्षाव होत आहे’, असे मला जाणवते. मला राग आला, वाईट वाटले किंवा निराशा आली असेल, अशा वेळी मी पू. आबांकडे नुसते बघितले, तरीही ‘मी त्या स्थितीतून कधी बाहेर पडते’, ते मला कळतही नाही.

१५ आ. बरे वाटत नसतांना त्यांना सूक्ष्मातून जाणीव होऊन त्यांनी भ्रमणभाष करणे आणि ते समवेत असल्याचे सांगणे अन् नेहमीप्रमाणे डोक्यावरून हात फिरवणे, त्यानंतर थोड्याच वेळात बरे वाटणे : मला बरे वाटत नसतांना पू. आबा माझ्या डोक्यावरून हात फिरवतात. त्या वेळी ‘त्यांचे चैतन्य माझ्या शरिरात येत आहे’, असे मला जाणवते. त्यानंतर काहीच वेळातच मला बरे वाटते. एकदा मला बरे वाटत नव्हते. तेव्हा पू. आबा माझ्या समवेत नव्हते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘आता पू. आबा माझ्या समवेत असते, तर त्यांनी लगेच माझ्यासाठी उपाय केले असते.’ त्याच वेळी पू. आबांचा मला भ्रमणभाष आला. ते मला म्हणाले, ‘‘मी तुझ्या समवेत नाही’, असे तुला कुणी सांगितले ? मी आणि परम पूज्य तुझ्या समवेत आहोत. तू काळजी करू नकोस. देवाला प्रार्थना कर. नामजप कर. मी इकडून तुझ्या डोक्यावरून हात फिरवतो.’’ त्या वेळी ‘ते खरंच माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहेत’, असे मला जाणवले. त्यानंतर थोड्याच वेळात मला बरे वाटू लागले. तेव्हा ‘पू. आबा केवळ स्थुलातूनच नव्हे, तर सूक्ष्मातूनसुद्धा कार्य करत असतात’, असे माझ्या लक्षात आले.’

– कु. ऐश्‍वर्या योगेश जोशी (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, मिरज. (११.३.२०२१)

 (समाप्त)

पू. आबांचा दैनिक ‘सनातन प्रभात’विषयीचा उत्कट भाव !

१. दैनिक ‘सनातन प्रभात’ला भावपूर्ण नमस्कार करणे : ‘प्रतिदिन सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’ आल्यावर पू. आबा दोन्ही हातांत दैनिक घेऊन त्या दैनिकाकडे भावपूर्ण पहातात. त्यानंतर ते दैनिक कपाळाला लावून त्याला नमस्कार करतात. दैनिकातील परात्पर गुरु डॉक्टर आणि सर्व संत यांच्या छायाचित्रांना नमस्कार करतात, तसेच दैनिक वाचत असतांनाही प्रत्येक वेळी संतांच्या छायाचित्रांना वरीलप्रमाणे नमस्कार करतात. दैनिक वाचून झाल्यावर ते दैनिक छातीशी धरून काही वेळ ठेवतात. दैनिक वाचून झाल्यावरही पू. आबा दैनिकाला वरीलप्रमाणेच भावपूर्ण नमस्कार करतात.

२. या दैनिकातून ‘साक्षात् गुरुदेव आपल्याशी बोलत आहेत’, असा त्यांचा भाव असतो. ते दैनिक ‘सनातन प्रभात’ पूर्ण वाचतात.

३. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सांगितल्याप्रमाणे स्वतः आचरण करणे आणि इतरांनाही सांगणे : दैनिकात सांगितल्याप्रमाणे ते सर्व कृती आचरणात आणतात. ‘आज दैनिकात काय आले आहे ? आपण कोणते प्रयत्न करायचे आहेत ? प.पू. गुरुदेवांनी काय मार्गदर्शन केले आहे ?’, हे सर्व पू. आबा आम्हाला सांगत असतात.

४. अगोदरच्या दिनांकाचे ‘सनातन प्रभात’वाचत असतांनाही ‘हे गुरुदेवांचे संदेशपत्र आहे’, हा भाव न्यून न होणे : कधी पू. आबांना आधीच्या दिनांकाचे एखादे दैनिक मिळाले, तरीही ते वाचतांना त्यांचा असाच भाव असतो की, ‘हे आजचे दैनिक आहे.’ आधीच्या दिनांकाचे दैनिक पुन्हा वाचत असतांना माझा ‘हे गुरुदेवांचे संदेशपत्र आहे’, असा भाव रहात नाही; पण पू. आबा कोणत्याही दिनांकाचे ‘सनातन प्रभात’ असले, तरीही त्यांचा भाव न्यून होत नाही.

या सर्व कृतीतून पू. आबांचा दैनिक ‘सनातन प्रभात’प्रतीचा भाव शिकायला मिळतो.’

– कु. ऐश्‍वर्या योगेश जोशी (११.३.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक