गोवा सुरक्षा मंचच्या वतीने म्हापसा येथील उपजिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
|
म्हापसा, २८ मार्च (वार्ता.) – कळंगुट येथील ‘सेक्स टॉईज’ हे दुकान सध्या बंद असले, तरी दुकानाला दिलेल्या शासकीय अनुज्ञप्त्या रहित न झाल्याने हे दुकान पुन्हा कधीही चालू होऊ शकते. त्यामुळे या दुकानाला दिलेल्या अनुज्ञप्त्या कायमस्वरूपी रहित कराव्या, अशी मागणी गोवा सुरक्षा मंचच्या गोवा प्रांत महिला अध्यक्षा तथा अधिवक्त्या रोशन सामंत यांनी केली आहे. गोवा सुरक्षा मंच या राजकीय पक्षाने बार्देश तालुक्यातील सर्व महिलांच्या वतीने म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी कपिल फडते यांना हे निवेदन सुपुर्द केले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘सेक्स टॉईज’ हे दुकान बार्देश तालुक्यात चालू होणे, ही एक चिंताजनक आणि लज्जास्पद गोष्ट आहे. कॅसिनो, अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय यांमुळे यापूर्वीच गोव्याचे नाव अपकीर्त झाले आहे आणि आता ‘सेक्स टॉईज’ दुकानामुळे यामध्ये आणखीनच भर पडली आहे. कळंगुट येथे भरवस्तीत हे दुकान यापुढेही चालू राहिल्यास कहरच होणार आहे. अश्लीलतेला खतपाणी घालणारे हे दुकान गोव्याच्या तरुण पिढीला घातक ठरू शकते. अशा दुकानाला शासन अनुज्ञप्ती कशी देते ? याविषयी संबंधितांवर कारवाई करावी. दुकानाला दिलेल्या सर्व अनुज्ञप्त्या रहित करून ते कायमचे बंद करावे, तसेच पुढील पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अशा प्रकारच्या दुकानांना यापुढे अनुज्ञप्ती नाकारावी.
महिलांच्या मागणीला उपजिल्हाधिकार्यांचा सकारात्मक प्रतिसाद
महिलांच्या मागणीला उपजिल्हाधिकारी कपिल फडते यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती अधिवक्त्या रोशन सामंत यांनी दिली आहे. अधिवक्त्या रोशन सामंत पुढे म्हणाल्या, ‘‘उपजिल्हाधिकारी कपिल फडते यांनी त्वरित या दुकानावर कोणत्या अधिनियमांखाली कारवाई करता येऊ शकते, याविषयी अभ्यास करण्याची सूचना कार्यालयातील कर्मचार्यांना केली आहे, तसेच त्यानुसार पोलिसांना निर्देश देणार असल्याचे आश्वासनही उपजिल्हाधिकार्यांनी दिले आहे.’’