परमबीर सिंह देहलीत कुणाला भेटले ? – रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

नगर – एखादा वरिष्ठ अधिकारी जेव्हा आरोप करतो, तेव्हा त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. त्यामुळे राष्ट्र्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे; पण जेव्हा हे पत्र वाचले, तेव्हा असे लक्षात आले की, त्यामध्ये दिनांकाचा घोळ झालेला आहे. त्यामुळे या पत्रातील आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे पडताळून पहाण्याची आवश्यकता आहे. हाच अधिकारी जेव्हा पदावर असतो, तेव्हा एक शब्दही बोलत नाही आणि पदावरून दूर गेल्यावर बोलणे, सर्वोच्च न्यायालयात जाणे, देहलीत जाऊन कुणाची भेट घेतली, या सर्व गोष्टी पहाव्या लागतील. यात राजकारण चालू आहे, असे अनेकांना वाटत आहे, असे वक्तव्य जामखेड येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप चालू असतांना रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधत प्रतिक्रिया व्यक्त केली.