कुशाग्र बुद्धीमत्ता असलेला, इतरांना साहाय्य करणारा आणि संतांप्रती भाव असणारा कु. उत्कर्ष अभिनय लोटलीकर !

कुशाग्र बुद्धीमत्ता असलेला, इतरांना साहाय्य करणारा आणि संतांप्रती भाव असणारा फोंडा, गोवा येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. उत्कर्ष अभिनय लोटलीकर (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. उत्कर्ष लोटलीकर एक आहे !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

फोंडा, गोवा येथील बालसाधक कु. उत्कर्ष अभिनय लोटलीकर याचा फाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमीला (२०.३.२०२१) वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि अन्य नातेवाईक यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

(‘वर्ष २०१९ मध्ये कु. उत्कर्षची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के होती.’ – संकलक)

कु. उत्कर्ष लोटलीकर

कु. उत्कर्ष अभिनय लोटलीकर याला सातव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. वैद्या (सौ.)  मुक्ता आणि श्री. अभिनय लोटलीकर (चि. उत्कर्षचे आई-वडील), फोंडा, गोवा. 

१ अ. समजूतदारपणा

१ अ १. ‘आपल्या समवेत केवळ कृष्णच खरी मैत्री करू शकतो, दुसरे कुणीही नाही’, असे उत्कर्षला सांगितल्यावर त्याची श्रीकृष्णावर ठाम श्रद्धा बसणे : ‘उत्कर्ष शाळेत कोणत्याच मित्र-मैत्रिणींना कधी चिडवत नाही. सर्व मित्रांशी जुळवून घेतो. त्याला काही जण शाळेत एकटे पाडत; परंतु तो त्या परिस्थितीतसुद्धा शांत रहात असे. घरी आल्यावर तो मला सांगत असे, ‘‘मित्र मला एकटे पाडतात, माझाशी कट्टी घेतात.’’ तेव्हा मी त्याला म्हणायचे, ‘‘केवळ कृष्णच आपल्या समवेत खरी मैत्री करू शकतो. दुसरे कुणीही नाही.’’ त्याची यावर ठाम श्रद्धा बसली. त्यानंतर त्याच्याशी कुणी कसेही वागले, तरी तो श्रीकृष्णालाच सांगतो.

१ अ २. आईला प्रेमाने क्षमा करणे : एकदा मी उत्कर्षवर पुष्कळ चिडून त्याला मारले. थोड्या वेळाने मी शांत झाल्यावर त्याची क्षमा मागितली. तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘असू दे आई, माझी चूक झाली; म्हणूनच तू मला मारलेस. मी पुन्हा असे चुकीचे वागणार नाही’’, असे म्हणून त्याने मला प्रेमाने जवळ घेतले.

१ अ ३. सेवेला गेल्यावर पाळणाघरात आनंदाने रहाणे : दळणवळण बंदीपूर्वी मी सेवेसाठी बाहेर जायचे. तेव्हा तो पाळणाघरात आनंदाने रहायचा. मी सेवेहून घरी परतल्यावर तो मला आवर्जून विचारायचा, ‘‘आई, तुझी सेवा चांगली झाली ना ?’’ कधी सेवेला त्याला समवेत नेल्यास तिथेही तो खेळत बसायचा. तिथल्या साधिकांशी ओळख करून घ्यायचा.

१ अ ४. दळणवळण बंदीची परिस्थिती विनातक्रार स्वीकारणे : दळणवळण बंदी चालू झाल्यानंतर उत्कर्षने ती परिस्थिती सहज स्वीकारली. त्याने बाहेर खेळण्यासाठी कधीही हट्ट केला नाही, तसेच घरी जे पदार्थ बनतील, ते सर्व खाण्याची सवय करून घेतली.

१ आ. इतरांना प्रेमाने साहाय्य करणे 

१. पुणे येथे असतांना दळणवळण बंदीच्या काळात सर्व कामे घरीच करावी लागायची. त्या वेळी उत्कर्ष मला म्हणायचा, ‘‘आई, तू एक दिवस पूर्ण विश्रांती घे. सगळी कामे मी आणि बाबा (वडील) मिळून करतो. तो मला भाजी चिरून देणे, घर झाडणे इत्यादी कामांत साहाय्य करायचा.

२. आता मी दिवसभर स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेसाठी रामनाथी, गोवा येथील आश्रमात असते. त्यामुळे उत्कर्ष त्याच्या आजीजवळ असतो. तो त्याच्या आजीलासुद्धा भांडी घासणे, भाजी चिरणे, कपडे वाळत घालणे इत्यादी कामांत साहाय्य करतो.

१ इ. स्वावलंबी

अंघोळ करणे, शाळेचा अभ्यास करणे इत्यादी स्वतःची कामे तो स्वतः करू लागला आहे. ‘ऑनलाईन’ शाळा कशी ‘जॉईन’ करायची ?’, ते शिकून आता तो स्वतःच जोडणी करतो अन् वर्गातील अभ्यास करतो.

१ ई. कुशाग्र बुद्धी 

शाळेत वजाबाकी शिकवण्यापूर्वीच तो तोंडी वजाबाकी करायला शिकला. त्याने बुद्धीबळ हा खेळ लगेच शिकून घेतला. आता तो त्यात आणखी निपुण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे.

१ उ. मानसपूजा करतांना उत्कर्षने ‘स्वतःची अयोग्य सवय घालवणार’, असे प.पू. गुरुदेवांना सांगणे आणि त्याचे पूर्णतः पालन करणे 

पुण्यात असतांना त्याला दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, तसेच भ्रमणभाष बघण्याची पुष्कळ सवय लागली होती. यासाठी मी त्याला सर्वतोपरी सांगून बघितले; पण हट्टीपणामुळे तो काही ऐकत नसे. एक दिवस मी त्याला म्हटले, ‘‘तू माझे ऐकत नाहीस. मी आता परम पूज्य आबांनाच (परात्पर गुरु डॉक्टरांना) तुझे नाव सांगणार आहे.’’ त्यानंतर त्याला चुकीची जाणीव झाली आणि त्याने मानसपूजा करतांना प.पू. गुरुदेवांना म्हटले, ‘मी आता दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम आणि भ्रमणभाष बघणार नाही. तेव्हापासून त्याने दोन्ही गोष्टी पहाणे सोडून दिले आहे.

१ ऊ. त्याला देवतांची शस्त्रे हातात घेऊन त्यांच्याप्रमाणे वेशभूषा करायला पुष्कळ आवडते.

१ ए. संतांच्या गोष्टी ऐकण्याची आवड निर्माण होणे आणि जिज्ञासेने गोष्ट ऐकून प्रश्‍न विचारणे 

एकदा मी संत ज्ञानेश्‍वरांची गोष्ट सांगत असतांना ‘संन्यास’ हा शब्द त्याला नव्याने कळला. त्याने थांबून आधी ‘संन्यास’ म्हणजे काय ?’, ते पूर्ण समजून घेतले आणि नंतर पुढची गोष्ट ऐकली. त्यानंतर ज्ञानेश्‍वरांच्या पाठीवर मुक्ताईने मांडे करणे, रेड्याच्या तोंडून वेद वदवणे, विठ्ठलाने नामदेवांची खाल्लेली खीर इत्यादी सर्व गोष्टी त्याला ऐकायला आवडू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायलाही त्याला पुष्कळ आवडते.

१ ऐ. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवणारा बाल उत्कर्ष ! 

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया चालू केल्यावर मी स्वभावदोषांची पाटी गळ्यात घातली. त्या वेळी उत्कर्षनेसुद्धा त्याच्या स्वभावदोषांची सूची बनवून त्याची पाटी केली आणि गळ्यात घालायला प्रारंभ केला. त्याच्याकडून चूक झाल्यास तो कान पकडून क्षमायाचनाही करू लागला. दिवसभरात त्याच्याकडून झालेल्या चुका लिहिण्यासाठी त्याने एक वही केली आहे. त्यात तो जमेल तशा चुका लिहिण्याचा प्रयत्न करतो.

१ ओ. रात्री झोपण्यापूर्वी भावप्रयोग करून झोपणे

एक दिवस मी त्याला जवळ बसवून एक भावप्रयोग केला. तो त्याने एकदाच ऐकला आणि रात्री झोपतांना जसाच्या तसा मला म्हणून दाखवला. त्यानंतर प्रतिदिन रात्री झोपतांना तो मला भावप्रयोग ऐकवत असे. मी विसरले, तर तो मला झोपेतून उठवून भावप्रयोग करायला लावत असे.

१ औ. संतांप्रती भाव

१. पू. लोटलीकरआजींना (चि. उत्कर्षच्या वडिलांच्या आजी) भेटायला गेल्यावर त्याला पुष्कळ आनंद व्हायचा. एकदा पू. आजी पुष्कळ आजारी होत्या. आम्ही त्यांना रुग्णालयात भेटायला गेलो होतो. तेव्हा त्याच्या डोळ्यांत पाणी आले आणि तो मला म्हणाला, ‘‘आजीला बरे वाटेल ना लवकर ?’’ पू. आजी रुग्णाईत असूनही त्याच्याकडे बघून स्मितहास्य करत होत्या.

२. पू. कुसुम जलतारेआजी (चि. उत्कर्षच्या आईच्या आजी) दिवाळीत घरी आल्या होत्या. दिवाळीचा नवीन साबण वापरायला काढल्यावर उत्कर्ष मला म्हणाला, ‘‘मी नवीन साबण घेऊन प्रथम पू. आजींचे चरण धुणार आहे. पू. आजींची मानसपूजा करणार आहे.’’

३. एकदा पू. जलतारेआजी ‘कल्याण करी रामराया’ हे भजन म्हणत असतांना उत्कर्षची पुष्कळ भावजागृती झाली आणि त्याच्या डोळ्यांतून पाणी आले. भजन ऐकून तो मला म्हणाला, ‘‘पू. आजी किती भजन छान म्हणते ना !’’

४. पू. जलतारेआजी जिना चढतांना आणि उतरतांना उत्कर्ष त्यांचा हात धरण्यासाठी पुढे जाऊन त्यांना गाडीपर्यंत सोडायला जात असे.

संत-आजींविषयी त्याला पुष्कळ प्रेम वाटते.

२. श्री. श्रेयस पिसोळकर (चि. उत्कर्षचे मामा), जळगाव

२ अ. चुकांविषयी संवेदनशीलता

‘एकदा उत्कर्ष खेळत असतांना चुकून कंगव्याचे २ दात तुटले. तेव्हा त्याने लगेच येऊन मला ही चूक सांगितली आणि ‘‘मला क्षमा कर, मी परत अशी चूक करणार नाही’’, असे सांगितले. त्याने केलेल्या या कृतीतून मला शिकता आले आणि त्याचे कौतुकही वाटले.

२ आ. एकपाठी

एकदा मी उत्कर्षला बाजीप्रभु देशपांडे यांची गोष्ट सांगितली. गोष्ट पूर्ण झाल्यावर मी त्याला म्हटले, ‘‘आता मी जी गोष्ट तुला सांगितली, ती तू मला सांग.’’ तेव्हा मी ज्या पद्धतीने गोष्ट सांगितली आणि शब्द वापरले, अगदी त्याच पद्धतीने त्याने आवाजाचा चढउतार हे सर्व अगदी माझ्याप्रमाणेच करून मला गोष्ट सांगितली.

३. श्री. योगेश जलतारे (चि. उत्कर्षचे मामाआजोबा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

३ अ. संतांप्रती निरागस भाव असलेला उत्कर्ष !

१. एकदा उत्कर्षला घरातील काही जणांसह एका संतांना भेटण्यासाठी जायचे होते. तेव्हा त्याने त्याच्या आजीकडे संतांसाठी काहीतरी खाऊ नेण्याचा आग्रह केला.

त्याविषयी मी त्याला विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘संत आपल्यासाठी इतके करतात, तर आपण त्यांच्यासाठी काही न्यायला नको का ?’’

२. एकदा तो पू. (श्रीमती) जलतारेआजी यांच्याकडे एकटक पहात होता. मी त्याला जिज्ञासेने विचारले, ‘‘तू पू. आजींकडे काय पहात होतास ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘पू. आजींमध्ये देव आहे ना !’’


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक