कळंगुट येथील भारतातील पहिल्या ‘सेक्स टॉय शॉप’ प्रकरणी चौकशी करण्यात यावी ! – ‘गोवा वुमन्स फोरम’ची मागणी

सेक्स टॉय शॉप’ बंद करण्यात आले

पणजी, १८ मार्च (वार्ता.) – प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यावर बंद करण्यात आलेल्या कळंगुट येथील भारतातील पहिल्या ‘सेक्स टॉय शॉप’ला कुणी अनुज्ञप्ती दिली याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ‘गोवा वुमन्स फोरम’ने केली आहे. या संघटनेने उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘‘१४ फेब्रुवारी २०२१ या दिवशी कळंगुट येथे भारतातील पहिले ‘सेक्स टॉय शॉप’ उघडण्यासंबंधी दिलेल्या अनुज्ञप्तीविषयी चौकशी करण्यात यावी. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी हस्तक्षेप करून हे दुकान कायदेशीर ठरण्याविषयी शासनाने अनुज्ञप्ती  दिली आहे का ? याची चौकशी करावी. नवीन ग्राहक सरंक्षण कायदा २०१९ प्रमाणे दिशाभूल करणार्‍या जाहिराती देणे हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे हे प्रकरण लवकरात लवकर हाताळावे. या सर्वत्र पसरलेल्या बातमीचा गोव्यातील पालक आणि मुले यांच्यावर परिणाम होईल. सर्वत्र विरोध झाल्यानंतर हे दुकान बंद करण्यात आले आहे; परंतु असले दुकान कायमचे गोव्याच्या हद्दीबाहेर पोचवले पाहिजे.’’

या संघटनेच्या समन्वयक लोर्ना फर्नांडिस म्हणाल्या, ‘‘गोवा वुमन्स फोरम हा ग्राहकांच्या हक्काविषयीचा मंच असून या ‘सेक्स टॉय शॉप’ विषयीच्या कायदेशीर गोष्टींविषयी फोरमकडे काही माहिती आहे का ? अशी विचारणा येथील स्थानिक पालक, शिक्षक, मुख्याध्यापक इत्यादींकडून आमच्याकडे केली जात आहे. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्याने अशा प्रकारचे ‘सेक्स टॉय शॉप’ उघडले आहे, या बातमीमुळे गोवा शासनाने असे दुकान उघडण्यास अनुज्ञप्ती दिली आहे, असा अर्थ होतो.’’