मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यास पाठिंबा देणार्‍या अन् परात्पर गुरु डॉक्टरांप्रती दृढ श्रद्धा असणार्‍या श्रीमती उषा बडगुजर !

मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यास पाठिंबा देणार्‍या अन् परात्पर गुरु डॉक्टरांप्रती दृढ श्रद्धा असणार्‍या जळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उषा बडगुजर (वय ६१ वर्षे ) !

‘मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अष्टमी (६.१.२०२१) या दिवशी जळगाव येथील श्रीमती उषा बडगुजर यांचा ६१ वा वाढदिवस झाला. त्यादिवशी त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी घोषित केले. यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत

श्रीमती उषा बडगुजर

१. श्री. उदय बडगुजर (मुलगा)

१ अ. सातत्य : आई प्रतिदिन पहाटे ४.३० वाजता उठून अंघोळ करून नामजप करते. घरात कितीही घाई असली, तरीही ती देवपूजा ठरलेल्या वेळेत करते. तिच्या या दिनक्रमात कधीही पालट होत नाही.

१ आ. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे

१. आईच्या लहानपणी तिच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याने आणि ती सर्व भावंडांमध्ये मोठी असल्याने तिला घरातील कामे करावी लागत आणि भावंडांना सांभाळावे लागत असे. तिने हे सर्व सांभाळून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. तिने हे सहजतेने आणि आनंदाने स्वीकारले.

२. माझ्या वडिलांना कार्यालयातील कामात अधिक वेळ द्यावा लागत होता. त्यामुळे त्यांना आम्हाला वेळ देणे किंवा घरातील अन्य कामे करणे जमत नसे. त्या वेळी आईने आमचा अभ्यास घेणे, घरातील अन्य कामे करणे, हे सहजतेने केले. ती नेहमी सर्व कामे कंटाळा न करता करत होती.

१ इ. अध्यात्माची आवड

१. आई पूर्वी शिवाची उपासना करायची. ती लग्नानंतर स्वाध्याय परिवाराच्या सत्संगाला जायची. त्या वेळी ती आम्हालाही समवेत न्यायची. तिने आमच्याकडून रामरक्षा, गणपति अथर्वशीर्ष आदी स्तोत्रे पाठ करून घेतली.

२. आम्ही लहानपणी सतत रुग्णाईत असायचो. त्या वेळी ती आम्हाला वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासह गजानन महाराज यांचे स्मरण करणे, त्यांची पोथी वाचणे, असेही करत असे. तिच्या प्रयत्नांमुळे ‘देवच तिला परिस्थिती स्वीकारण्याची शक्ती देतो’, असे मला जाणवायचे. आई तिच्या आचरणातून आमच्यावर देवाधर्माचे संस्कार करायची.

१ ई. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला आरंभ

१ ई १. स्वतः शास्त्रानुसार साधना करणे आणि मुलांकडून करवून घेणे : वर्ष १९९९ पासून आम्ही सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला आरंभ केला. त्या वेळी सत्संगात ‘मनाप्रमाणे साधना न करता शास्त्रानुसार साधना करावी’, असे सांगितले होते. त्यानुसार आईने शास्त्रानुसार साधनेचे प्रयत्न करायला आरंभ केला आणि तिने आमच्याकडूनही तसे प्रयत्न करवून घेतले.

१ ई २. गुरुदेवांची प्रथम भेट आणि सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याचा निश्‍चय करणे : वर्ष २००३ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले जळगाव येथे आले होते. त्या वेळी त्यांचे जळगाव येथील साधकांसाठी मार्गदर्शन होते. तेव्हा आईला ‘गुरुदेवांच्या दर्शनाला जायला हवे’, असे वाटत होते; पण त्यांचे मार्गदर्शन रात्री होते आणि आम्ही धुळे येथे रहात होतो. तेव्हा तिने सर्व अडचणींवर मात करून सत्संगाला जायचे ठरवले. आईने गुरुदेवांना प्रथमच पाहिले आणि त्यांचा सत्संग मिळाल्यापासून आईची परात्पर गुरुदेवांप्रती श्रद्धा दृढ झाली. त्यानंतर आईने सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याचा निश्‍चय केला.

१ ई ३. स्वतःचे घर सनातन संस्थेला सेवाकेंद्रासाठी वापरण्यास देणे : आम्ही धुळे येथे रहात असतांना आमचे घर २ खोल्यांचे होते. त्या वेळी आमच्या घरीच सेवाकेंद्र होते. सामूहिक नामजप, सत्संग, साधकांची निवासव्यवस्था, असे सर्व आमच्या घरी असायचे. त्या वेळी आई घरातील कामे वेळेत पूर्ण करून सत्संग, साधकांची निवास आणि भोजन यांची व्यवस्था आदी सेवा न थकता करत असे. त्यातून आईला आनंद मिळायचा.

१ ई ४. संतसेवा करण्याची संधी मिळणे 

अ. एकदा परात्पर गुरु देशपांडेकाका आणि अन्य साधक धुळे येथे येणार होते. त्या वेळी आईला पुष्कळ आनंद झाला. आईने घरातील स्वच्छता, संतसेवा, महाप्रसाद आदी सेवा नियोजन करून पूर्ण केल्या.

आ. वर्ष २००३ मध्ये पू. पेठेआजी आमच्या घरी २ दिवस रहायला आल्या होत्या. त्याच वेळी आईचा अपघात होऊन तिच्या पायाचा अस्थिभंग झाला होता. आमचे घर लहान  होते, तरी आईने पू. पेठेआजींची व्यवस्था आमच्या घरी करायला सांगून सर्व सिद्धता केली. त्या वेळी तिने ‘घराला संतांचा चरणस्पर्श होऊन त्यांचे चैतन्य मिळेल’, असा भाव ठेवून संतसेवेची सिद्धता करवून घेतली. (त्या कालावधीत तिने मला स्वयंपाक करायला शिकवला.)

१ ई ५. निर्भय

अ. माझ्या बाबांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पुणे आणि मुंबई येथील आधुनिक वैद्यांकडे जावे लागायचे. मोठ्या शहरात सर्व अनोळखी असतांना आणि तिला त्याचा काहीही पूर्वानुभव नसतांना तिने ते सर्व समजून घेतले अन् ती परिस्थितीला धिराने सामोरे गेली.

आ. आई एकटीने लांबचा प्रवास करते.   

१ ई ६. यजमानांचे निधन झाल्यावर स्थिर राहून गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाणे आणि सेवेत मन गुंतवणे : माझ्या बाबांचे अकस्मात् निधन झाले. त्या वेळी आई स्थिर आणि शांत होती. त्या कालावधीत आई प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी सर्वांकडून दत्ताचा नामजप करून घ्यायची. आईने अनेक प्रसंग गुरुदेवांना आत्मनिवेदन रूपात सांगितले. माझे बाबा नसतांना घरातील आणि व्यवहारातील कृती तिने स्वतःहून प्रयत्नपूर्वक शिकून घेतल्या. तेव्हा आई सतत देवाचा धावा करायची. त्या प्रसंगातून आईने स्वतःला सावरले आणि सेवेला आरंभ केला.

१ ई ७. आम्ही (मी आणि माझी पत्नी) पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवल्यावर आईने आम्हाला आनंदाने पाठिंबा दिला.

१ ई ८. मुलगा आणि सून पूर्णवेळ साधना करत असल्याने नातवाला सांभाळणे अन् त्याच्याकडून साधनेचे प्रयत्न करवून घेणे : आम्ही पूर्णवेळ साधना करू लागल्यावर काही मासांनी माझी पत्नी देवद आश्रमात सेवेसाठी गेली आणि मी नांदेड येथे सेवेसाठी गेलो. तेव्हा आमचा मुलगा कु. सोहम ५ वर्षांचा होता. तो माझ्या आईकडे (त्याच्या आजीकडे) रहाणार होता. आईने त्याचा अभ्यास घेणे, त्याच्याकडून साधनेचे प्रयत्न करवून घेणे आणि घरातील कामे करणे, हे सहजतेने केले.

१ उ. शिकण्याची वृत्ती : दळणवळण बंदीच्या काळात बाहेर जाऊन समष्टी सेवा करणे शक्य नव्हते. त्या वेळी सर्व सेवा ‘ऑनलाईन’ चालू झाल्या. आईला अँड्रॉइड भ्रमणभाष वापरता येत नव्हता; पण तिने ते शिकून घेतले. ती सत्संगाची ‘लिंक’ पाठवणे, दैनिक ‘सनातन प्रभात’ची पीडीफ् पाठवणे, संपर्क करणे आदी सेवा करायला शिकली.

१ ऊ. संतांनी दिलेला आशीर्वादस्वरूप संदेश : आईला पूर्वी कविता करता येत नव्हत्या; पण काही वर्षांपासून (५ – ६ वर्षांपासून) गुरुकृपेने आईला कविता सुचू लागल्या. आईची एक कविता वाचल्यावर पू. अनंत आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांनी एका साधिकेच्या माध्यमातून आईला संदेश पाठवला, ‘भाषेचे लालित्य आणि प्रभाव यात न पडता ‘त्यांना काय म्हणायचे आहे, ते थोडक्यात आणि स्पष्टपणे पुष्कळ छान व्यक्त केले आहे. आवडले.’

१ ए. कर्तेपणा नसणे : आईने केलेल्या कविता दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर संत आणि साधक यांनी आईचे कौतुक केल्यावर तिच्या मनात कर्तेपणाचे विचार येत नाहीत. ती त्याचे सर्व श्रेय गुरुचरणी अर्पण करते.

१ ऐ. आई भाववृद्धी सत्संगात सांगितल्याप्रमाणे भावाचे प्रयत्न करते आणि पुढील भाववृद्धी सत्संगात गुरुदेवांच्या कृपेने तिच्याकडून झालेले प्रयत्न सांगण्याचा ती प्रयत्न करते.

१ ओ. जाणवलेले पालट : भावनाशीलता न्यून होणे, भीती न वाटणे आणि परिस्थिती स्वीकारणे

१ औ. अनुभूती

१ औ १. समष्टी सेवेला आरंभ केल्यावर सांधेदुखीचा त्रास उणावणे : आईला सांधेदुखीचा त्रास आहे. आईने गुरुदेवांच्या कृपेने समष्टी सेवेला आरंभ केल्यावर हा त्रास उणावला. गुरुपौर्णिमा आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभा या वेळी आई घरोघरी जाऊन प्रसार करते आणि तेथून आल्यावर स्वयंपाक अन् घरातील अन्य कामे करते. आईला गुरुकृपेनेच हे शक्य होते.

१ औ २. खासगी पतपेढीत ठेवलेले पैसे पतपेढी बंद झाल्याने मिळणार नसल्याचे कळूनही स्थिर राहून मुलगा आणि सून यांना नामजपादी उपाय करण्यास सांगणे अन् काही मासांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर देवाच्या कृपेने ठेवलेली सर्व रक्कम परत मिळणे : वर्ष २००९ मध्ये आम्ही एका खासगी पतपेढीत पैसे ठेवले होते. आम्ही तेथील खाते बंद करायला गेलो असतांना आम्हाला ‘ती पतपेढी बंद झाली आणि त्यातील ठेवीदारांना पूर्ण रक्कम मिळणार नाही’, असे समजले. हा प्रसंग आमच्यासाठी पुष्कळ कठीण होता; कारण तसे झाल्यावर आमची पुष्कळ आर्थिक हानी होणार होती. आम्ही ‘आईला याविषयी काही सांगायचे नाही’, असे ठरवले आणि कायदेशीर प्रक्रियेला आरंभ केला; मात्र काही दिवसांनी आईला यासंदर्भात कळले. त्या वेळी ती स्थिर होती. आईने आम्हाला शांतपणे सांगितले, ‘‘तुम्ही याचा ताण घेऊ नका. देवावर श्रद्धा ठेवा. त्यामुळे योग्य मार्ग मिळून अचूक निर्णय घ्यायला सोपे जाईल. गुरुदेवांना सर्व ठाऊक आहे. आपण आपले साधनेचे प्रयत्न वाढवूया. आपली काहीच हानी होणार नाही.’’ तिने आम्हाला नामजपादी उपाय करायला सांगितले. काही मासांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर देवाच्या कृपेने आम्हाला सर्व रक्कम मिळाली. गुरुकृपेमुळेच हे शक्य झाले.

२. सौ. वेदांती बडगुजर (सून), सनातन आश्रम, देवद, पनवेल

२ अ. नातवाला प्रेमाने सांभाळणे : मी देवद आश्रमात पूर्णवेळ सेवा करण्यासाठी आले. त्या वेळी माझा मुलगा (कु. सोहम) हा ५ वर्षांचा होता. सासूबाईंनी सोहमला प्रेमाने सांभाळले. त्यांनी सोहमविषयी कधीही तक्रार केली नाही. सोहम आणि सासूबाई यांना पाहून मला नेहमी श्रीकृष्ण आणि यशोदामाता यांचे स्मरण होते.

२ आ. शिकण्याची वृत्ती : आरंभी त्यांना सोहमसाठी नवीन पदार्थ करणे जमत नव्हते. नंतर त्यांनी ते सगळे शिकून घेतले. सोहमच्या शालेय उपक्रमाची सिद्धता करणे, त्यांच्यासाठी पुष्कळ कठीण होते; परंतु त्यांनी ते अल्पावधीतच शिकून घेतले.

२ इ. त्या आम्हाला करत असलेल्या साहाय्यामुळेच आम्ही पूर्णवेळ साधना करू शकतो.

२ ई. जाणवलेले पालट

२ ई १. सुनेला समजून घेणे : मला आध्यात्मिक त्रासामुळे सकाळी लवकर उठण्यास अडचण येते. पूर्वी त्यांना त्याविषयी पुष्कळ प्रतिक्रिया यायच्या. आता त्या मला समजून घेतात.

२ ई २. अपेक्षा नसणे : पूर्वी सासूबाईंना माझ्या आई-वडिलांकडून पुष्कळ अपेक्षा असायच्या. त्या माझ्या आई-वडिलांशी मोकळेपणाने बोलत नसत. आता त्या माझ्या आई-वडिलांना स्वतःहून दूरभाष करून मनमोकळेपणाने बोलतात.‘

परात्पर गुरु डॉक्टर, त्यांच्यामध्ये असलेले गुण आम्हालाही आत्मसात करता येऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

३. महर्लोकातून जन्माला आलेला ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. सोहम उदय बडगुजर (नातू, वय ८ वर्षे)

अ. आजी पुष्कळ प्रेमळ आहे. ती कधीही चिडचिड करत नाही. मी हट्ट केल्यावर ती मला शांतपणे समजावून सांगते.

आ. ती मला साधनेचे प्रयत्न करण्याची सतत आठवण करून देते, तसेच ती माझ्याकडून नामजप, प्रार्थना, आवरण काढणे आदी नियमितपणे करून घेते.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक