पणजी, १५ मार्च (वार्ता.) – समुद्रकिनारपट्टीत अमली पदार्थाची प्रकरणे आणि ‘रेव्ह’ पार्ट्याचे आयोजन यांमध्ये वाढ झाली आहे; मात्र हे रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत. यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्ष घालावे, अशी मागणी ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विनोद पालयेकर यांनी केले आहे.
अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एन्.सी.बी.) आणि गोवा गुन्हे अन्वेषण विभाग यांनी नुकताच वागातोर येथील ३ रेव्ह पार्ट्यांवर छापा टाकून लाखो रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले होते. ‘एन्.सी.बी.’चा हा नजीकच्या काळातील दुसरा मोठा छापा आहे. काही दिवसांपूर्वी ‘एन्.सी.बी.’ने गोव्यात ठिकठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवर आमदार विनोद पालयेकर यांनी ही मागणी केली आहे.