आतापर्यंत उघडले स्वर्गाचे दार, आम्ही पाचपुते यांसारख्या अनेक नाटकांतून केवळ देवता, साधू, संतच नव्हे, तर राष्ट्रपुरुषांचाही अनेक वेळा अवमान करण्यात आला आहे. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्याची ही पद्धत अद्यापही चालूच आहे ! अन्य पंथियांच्या संदर्भात असे कुणी करण्यास धजावत नाही !
मुंबई – ‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) संस्थेच्या वतीने मध्यप्रदेशातील नाट्य महोत्सवात लेखक विजय तेंडुलकर यांच्या ‘पाहिजे जातीचे’ नाटकाचे ‘जात ही पूछो साधू की’ या शीर्षकाने हिंदी भाषेत सादर करण्यात येणार होते. ‘या नाटकाच्या नावात ‘साधू’ हा शब्द कशासाठी ?’, असा आक्षेप घेत बजरंग दलाने ‘टुकडे टुकडे गँग’ कलेच्या नावाखाली तरुणाईला भडकवण्याचे काम करत आहे’, असा आरोप केला. त्यामुळे आयोजकांनी नाट्यमहोत्सव रहित केला. देशभरातील रंगकर्मींनी या प्रकाराचा निषेध केला आहे.
१. तेंडुलकर यांच्या या नाटकाला विरोध करणे, हे सांस्कृतिक अज्ञानाचे दर्शन आहे’, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली. नाटकाच्या शीर्षकाचा ‘साधू’ या शब्दाशी कोणताही संबंध नाही. हे शीर्षक नाटकाच्या अनुवादकाने एका दोह्यावरून घेतले आहे. त्याचा राजकीय किंवा धार्मिकता यांच्याशी संबंध नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
२. आयोजकांनी म्हटले आहे की, ‘इप्टा’चे ‘जात ही पूछो साधू की’ नाटकाचे आतापर्यंत विविध भाषांतून शेकडो प्रयोग झाले. आक्षेप घेणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे नाटक वाचलेले किंवा पाहिलेले नाही.
३. रंगकर्मी सतीश आळेकर यांनी म्हटले आहे की, नाटकाविषयी माहिती नसतांना केवळ शीर्षकावरून विरोध करणे, हे गैरसमजुतीतून घडले असावे. तेंडुलकर यांचे हे नाटक आपल्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारे आहे. ‘एक मुलगा नोकरीच्या मुलाखतीसाठी गेला असतांना त्याची उडणारी त्रेधातिरपीट’ या विषयावर त्यांनी उपहासात्मक भाष्य केले होते.
हिंदुद्वेषी नसिरुद्दीन शाह यांची गरळओक
(म्हणे) ‘जनतेला विचार करण्यास भाग पाडणार्या कामांना हिंदुत्वनिष्ठ संघटना मान्यता देत नाही !’
‘‘ज्या लोकांनी गदारोळ माजवला, त्यांना हे नाटक कोणत्या विषयावर आहे, याची कल्पना आहे, असे मला वाटत नाही. जनतेला विचार करण्यास भाग पाडेल, अशा कोणत्याही कामास अथवा निवेदनास या हिंदुत्वनिष्ठ संघटनेस मान्यता द्यायची नाही. तेंडुलकर यांच्या नाटकाला घेतलेला आक्षेप हा मुनावर फारुकी याच्या अटकेशी साधर्म्य दर्शवतो. उजव्या विचारसरणीच्या लोकांना त्रासदायक वाटतील, अशा कोणत्याही विचारांपासून इतर समाजाला दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे’’, असे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. (अभिनेते नसिरुद्दीन शाह याकडे हिंदुद्वेषातूनच पहात आहेत. नाटकाच्या माध्यमातून त्यांना जनतेला विचार करायला लावायचा असेल, तर त्यांनी खुशाल मौला-मौलवींचे नाव घालण्यास सांगावे ! – संपादक)
बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र शिव्हारे खुलासा करतांना म्हणाले की, बजरंग दलाने कोणतीही धमकी दिलेली नाही. केवळ पोलीस आणि प्रशासन यांना पत्र लिहून या नाटकांच्या प्रयोगांना बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. |