शिवोपासनेची वैशिष्ट्ये आणि शास्त्र

शिवपिंडीचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घेणे

शिवालयात असणारा नंदी हे शिवाचे वाहन आहे. शिवपिंडीचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घ्यावे. नंदीचे दर्शन घेतल्याने सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. यामुळे नंतर पिंडीचे दर्शन घेतांना, भक्ताला शिवाकडून येणार्‍या शक्तीशाली लहरी पेलण्याची क्षमता प्राप्त होते. शिवपिंडीचे दर्शन घेतांंना भक्ताने शिवपिंडी अन् नंदी यांच्यामध्ये उभे राहू नये किंवा बसू नये, तर नंदी आणि शिवपिंडी यांना जोडणार्‍या रेषेच्या बाजूला उभे राहून पिंडीचे दर्शन घ्यावे.

शिवालयात पिंडीची पूजा करणे

शिवालयात पिंडीची पूजा करतांना शाळुंकेच्या स्रोताच्या अगदी समोर बसू नये. याचे कारण म्हणजे शिवाच्या लहरी शाळुंकेच्या स्रोतातून अधिक प्रमाणात बाहेर पडतात. शाळुंकेच्या स्रोताच्या अगदी समोर बसल्यास शिवाच्या शक्तीशाली लहरी थेट अंगावर आल्याने उपासकाला त्या लहरींचा त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी पिंडीची पूजा करतांना पिंडीच्या जवळ अन्य ठिकाणी बसावे. शंकराच्या पिंडीला थंड पाणी, दूध अथवा पंचामृत यांनी स्नान घालतात.

शिवाला दुधाचा अभिषेक करणे

शिवाला अभिषेक दुधाचा करावा. याचे कारण म्हणजे दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते. त्यानंतर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन केल्याने शिवतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

शिवाला बेल वहाणे

ज्या वस्तूंमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा अधिक असते, अशा वस्तू देवतेला वाहिल्या, तर देवतेचे तत्त्व मूर्तीत येऊन देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. यासाठीच शिवाला बेल वहावा.

शिवाला श्‍वेत रंगाची फुले वहाणे

विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते. धोत्रा, श्‍वेतकमळ, श्‍वेत कण्हेर, चमेली, मंदार, नागचंपा, पुन्नाग, नागकेशर, निशिगंध, जाई, जुई, मोगरा, तसेच श्‍वेत पुष्पे शिवाला वहावीत. या फुलांच्या गंधामुळे शिवाचे तत्त्व पिंडीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार शिवाला दहा फुले वहावीत.

शिवाच्या तारक आणि मारक तत्त्वासाठी वापरायच्या उदबत्ती !

शिवाची पूजा करतांना त्याचे तारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता केवडा अथवा चमेली, यांपैकी कोणत्याही गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात, तर शिवाचे मारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता हीना अथवा दरबार या गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात.

शिवाला प्रदक्षिणा घालणे

प्रदक्षिणेचा मार्ग – १ ते ७

शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे, म्हणजे सोमसूत्री असते. शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे, म्हणजे सोमाच्या दिशेकडे मंदिराच्या विस्ताराच्या कडेपर्यंत (आवारापर्यंत) जे सूत्र, म्हणजे नाला जातो, त्याला ‘सोमसूत्र’ म्हणतात. प्रदक्षिणा घालतांना डाव्या हाताने जायचे आणि अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी शिवाच्या उपासनेमागील शास्त्र अर्थात् नहाळ (शाळुंकेचा पुढे नेलेला स्त्रोत) असते, तेथपर्यंत जाऊन तो न ओलांडता परत फिरायचे आणि पुन्हा पन्हाळीपर्यंत उलटे येऊन प्रदक्षिणा पूर्ण करायची. हा नियम शिवलिंग जर मानवस्थापित किंवा मानवनिर्मित असेल, तरच लागू असतो; स्वयंभू लिंगास, तसेच चल लिंगास (घरातील लिंगास) हा नियम लागू नाही. शाळुंकेच्या स्रोताला ओलांडत नाहीत; कारण तेथे शक्तीस्रोत असतो. तो ओलांडतांना पाय फाकतात आणि वीर्यनिर्मिती अन् पाच अंतस्थ वायू यांवर विपरीत परिणाम होतो. देवदत्त आणि धनंजय वायू आखडतात; मात्र ओलांडतांना स्वतःला आवळून ठेवले, म्हणजे नाड्या आखडल्या, तर परिणाम होत नाही. पन्हाळी ओलांडतांना आपल्या पायाची घाण तिच्यात पडली, तर तीर्थ म्हणून ते पाणी प्राशन केल्याने भाविकांना व्याधी होतील; म्हणून पन्हाळी ओलांडत नाहीत, असे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना वाटते !

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शिवाच्या उपासनेमागील शास्त्र’)