६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मानवत, परभणी येथील चि. श्रीनिधी हरिष पिंपळे (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. श्रीनिधी हरिष पिंपळे एक आहे !

वाढदिवसाच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. श्रीनिधी हरिष पिंपळे

परभणी – सतत श्रीगुरूंच्या स्मरणात रहाणारी, हरिपाठ म्हणणारी आणि परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्याची ओढ असणारी चि. श्रीनिधी हरीश पिंपळे हिची माघ शुक्ल पक्ष त्रयोदशी म्हणजेच २५ फेब्रुवारी या तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात आली. एका ‘ऑनलाईन’ सत्संगात सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सर्व साधकांना ही आनंदवार्ता दिली. या प्रसंगी श्रीनिधीचे वडील श्री. हरीश पिंपळे आणि आई सौ. मनीषा पिंपळे उपस्थित होत्या. या वेळी उपस्थितांची भावजागृती झाली.

चि. श्रीनिधीच्या आई-वडिलांचे मनोगत !

१. श्रीनिधीने भ्रमणभाष करून मला सांगितले होते की, उद्या माझा वाढदिवस आहे. तुम्ही येतांना प.पू. डॉक्टरांनापण घेऊन या ! – हरिष पिंपळे (चि. श्रीनिधीचे वडील)

२. देवाने मला सर्व काही दिले आहे. बोलण्यास शब्दच नाहीत. (या वेळी सौ. पिंपळे यांची पुष्कळ भावजागृती झाली होती.)

– सौ. मनीषा पिंपळे (चि. श्रीनिधीची आई)

चि. श्रीनिधीच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. वय – जन्म ते ६ मास

१ अ. दूरचित्रवाणीवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेतील गीत आवडणे : ‘श्रीनिधी साधारण सहा मासांची असतांना दूरचित्रवाणीवर ‘विठुमाऊली’ या मालिकेतील ‘अवतरे भूवरी रंग रूप हे विठुमाऊली’ हे गीत ऐकताच रांगत रांगत दूरचित्रवाणी संचाजवळ येऊन टाळ्या वाजवत या गीतावर ताल धरत असे. आम्ही हे गीत भ्रमणभाषवर घेतले आणि ती रडत असतांना प्रयोग म्हणून ते लावले. तेव्हा ती रडायचे थांबून या गीतावर टाळ्या वाजवत असे.

१ आ. आरतीची आवड : आमच्या घरी आश्रमात होते, त्याप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी नियमित आरती केली जाते. आरतीच्या वेळी शंखनाद झाल्यावर श्रीनिधी आरतीसाठी ध्यानमंदिरात येत असे.

२. वय – ६ मास ते १ वर्ष

२ अ. नामजपाची ओढ : श्रीनिधीला पेन आणि कागद मिळाल्यास ती ‘अभ्यास करते’, असे म्हणून लिहायला बसायची. तेव्हा ‘तू काय लिहितेस ?’, असे विचारले असता ती ‘‘श्री गुरुदेव दत्त’ लिहिते’’, असे सांगायची.

२ आ. भावासमवेत ‘शुभं करोति’ म्हणणे : संध्याकाळच्या वेळी श्रीनिधीचा भाऊ ऋतुराज ‘शुभं करोति’ म्हणत असतांना तिला म्हणता येत नसतांनाही ती दादासमवेत हात जोडून उभे राहून म्हणण्याचा प्रयत्न करायची.

३. वय – एक ते दीड वर्ष

३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांंप्रती भाव

१. श्रीनिधी घरातील ध्यानमंदिरात जाऊन परात्पर गुरु डॉक्टरांंच्या छायाचित्रासमोर उभी राहून ‘गुरु, तुम्ही काय करता ? तुम्ही जेवण केलं का ?’, असे विचारायची.

२. मी सेवेसाठी रामनाथी आश्रमात गेलो असतांना भ्रमणभाषवर तिच्याशी बोलणे व्हायचे. तेव्हा ती मला विचारायची, ‘‘बाबा, तुम्ही कुठे आहात ?’’ ‘मी सेवेसाठी गुरूंकडे रामनाथी आश्रमात आहे’, असे सांगताच ती म्हणायची, ‘‘मलाही गुरूंंकडे यायचे आहे. मीही सेवा करते.’’ ती प्रत्येक वेळी असे म्हणायची.

३. माझ्या लहान भावाच्या मुलाचे नाव अजून ठेवलेले नाही. त्याला सर्वजण वेगवेगळ्या नावाने बोलावतात. श्रीनिधी मात्र त्याला ‘गुरु’ (शब्द उच्चारता येत नसल्याने ‘गुलु’) या नावाने बोलावते.

४. वय – दीड ते दोन वर्षे

४ अ. देवाची ओढ

१. आमच्या घरासमोरच्या श्री गणपतीच्या मंदिरात नित्य हरिपाठ चालतो. ती एकटीच मंदिरात जाते आणि वारकरी ताल धरतात, त्याप्रमाणे भजनात नाचते.

२. मी बाहेर जातांना ती नमस्कार करते आणि हात उंचावून ‘जय श्रीराम’ म्हणते.

३. ध्यानाच्या वेळी ती ‘महाशून्य’ हा नामजप करते.

४ आ. नामजप आणि सेवा करत असतांना आईवडिलांना त्रास न देणे : दळणवळण बंदीच्या कालावधीत आम्ही दोघे दिवसभर ध्यानमंदिरात असायचो. नामजप आणि ‘ऑनलाईन’ सेवा करत असतांना ती घरात एकटीच खेळत असे.

५. वय – २ ते ३ वर्षे

५ अ. बर्‍याच वेळेला झोपेत असतांना तिचे हात नमस्काराच्या मुद्रेत असतात.

५ आ. गुरुदेवांप्रती ओढ

१. ‘दळणवळण बंदी संपल्यावर मी रामनाथी आश्रमात सेवेला जाण्याच्या संदर्भात उत्तरदायी साधकांना संपर्क केला होता. तेव्हा श्रीनिधी मला म्हणाली, ‘‘त्यांना सांगा, ‘‘मलाही प.पू. गुरुदेवांकडे यायचे आहे.’’

२. कधी कधी सकाळी झोपेतून उठल्यावर ती म्हणते, ‘‘बाबा, मी आता तुमची गाडी घेऊन प.पू. गुरुदेवांकडे जाणार आहे.’’

५ इ. वडिलांची स्थिती समजून घेऊन समजूतदारपणाने वागणारी श्रीनिधी ! : एके दिवशी मी बाहेरगावी जायला निघालो होतो. त्या वेळेस मला त्रास होत होता. माझे डोके पुष्कळ जड होऊन मला काहीच सुचत नव्हते. त्यामुळे माझी चिडचिड होत होती. त्या वेळी श्रीनिधी स्वतःहून मला म्हणाली, ‘‘बाबा, मला आज गाडीवरून चक्कर मारायची नाही. आपण उद्या सकाळी चक्कर मारू.’’ प.पू. गुरुदेवांची केवढी कृपा आहे. त्यांच्या प्रतीची कृतज्ञता शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही.’

– श्री. हरिष पिंपळे

६. स्वभावदोष

हट्टीपणा

अशा दैवी गुणांनी युक्त बालिका देऊन साधनेला प्रोत्साहन दिल्याविषयी आम्ही परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– सौ. मनीषा आणि श्री. हरिष पिंपळे (चि. श्रीनिधीचे आई-वडील), मानवत, जि. परभणी. (३१.१.२०२१)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक