आपत्काळाच्या दृष्टीने घरे बांधतांना लक्षात घ्यावयाची काही महत्त्वाची सूत्रे

‘अनेक संतांनी वेळोवेळी सांगून ठेवले आहे की, येणारा काळ अतिशय भयानक आहे. या भयानक आपत्काळाला आता आरंभ झाला असून ‘अकस्मात् ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडणे, नद्यांना पूर येणे, महामारी, युद्धसदृश परिस्थिती निर्माण होणे किंवा प्रत्यक्ष युद्ध होणे’, अशा प्रतिकूल गोष्टी घडत आहेत आणि यापुढेही घडू शकतात. अशी परिस्थिती आल्यास त्या वेळी ‘आपण कुठे रहायचे ? घरे कशी असावीत ?’ ‘आपत्काळात घर बांधण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ?’, या संदर्भातील सविस्तर विचार आपण या लेखात करणार आहोत. आपत्काळात घरे आणि त्यांची जागा निवडण्यासाठी यापूर्वीच्या लेखांमध्ये सविस्तर निकष सांगण्यात आले आहेत. त्या निकषांप्रमाणे जागेची निवड करावी.

‘आपत्काळाची तीव्रता लक्षात घेता महानगरांमध्ये रहाणे असुरक्षित आहे. त्यामुळे अनेक साधक खेडेगावात रहाण्यासाठी योग्य जागा शोधत आहेत. खेडेगावांत घर बांधण्यासाठी शेतजमीन ‘बिगरशेती (N.A. नॉन अ‍ॅग्रिकल्चरल लँड)’ करावी लागते. ‘गुंठेवारीने एक किंवा दोन सहस्र चौरस फूट भूखंड (‘प्लॉट’) घेऊन त्यावर घर बांधले, तरी चालते, ते सर्व कायदेशीर होते’, असे काहींना वाटते. ‘कुणीतरी एकाने शेतजमीन घेतली आणि तेथे सलग घरे बांधली, तरी चालतात’, अशा विचारातूनही काही ठिकाणी घरे बांधली जाऊ शकतात. या संदर्भात सखोल माहिती घेऊन ‘कायद्यानुसार काय करायला हवे ?’, हे समजून घेऊन घरे बांधावीत, म्हणजे आपली फसवणूक होणार नाही किंवा बांधकाम बेकायदेशीर होणार नाही.

१. शेतजमिनीवर घर बांधतांना ग्रामपंचायतीसह ‘नगररचना कार्यालया’ची अनुमती घेणेही आवश्यक !

खेडेगावांमध्ये शेतजमिनीवर घर बांधतांना केवळ ग्रामपंचायतीची अनुमती घेऊन चालत नाही, तर त्यासाठी ‘नगररचना कार्यालया’चीही (‘टाऊन प्लॅनिंग’चीही) अनुमती घ्यावी लागते. ‘नगररचना कार्यालया’ची अनुमती घेतल्याविना बांधकाम करणे बेकायदेशीर होते.

२. शेतजमीन खरेदीच्या नियमानुसार शेतजमीन खरेदी करणारा शेतकरीच असावा लागणे आणि एका वेळी न्यूनतम २० सहस्र चौरस फूट शेतजमीन विकत घेतल्यासच ती जमीन त्याच्या नावावर होऊ शकणे

काही जण ५ – ६ जणांमध्ये ५ सहस्र चौरस फूट जमीन विकत घेण्याचे ठरवतात. ‘प्रत्येकाच्या वाट्याला एक सहस्र फूट जमीन’, असे गृहीत धरून ते त्यावर घर बांधण्याची इच्छा बाळगतात; पण शेतजमीन विकत घेण्यासाठी एक सहस्र चौरस फुटाचा भूखंड पुरेसा नाही, तर शेतजमीन विकत घेण्यासाठी जो कायदा आहे, त्याप्रमाणे न्यूनतम २० सहस्र चौरस फूट जमीन विकत घेतल्यासच ही जागा त्या व्यक्तीच्या नावावर होते. ‘फार्महाऊस’ बांधायलाही २० सहस्र चौरस फूट जागा घेऊन तेथे केवळ ४ टक्के, म्हणजे ८०० स्वेअर फुटाचे बांधकाम करता येते.

त्याचप्रमाणे शेतजमीन विकत घेण्यासाठी विकत घेणारा शेतकरी असावा लागतो, म्हणजे सातबाराच्या उतार्‍यावर त्याच्या नावावर शेतजमीन असावी लागते.

३. शेतजमिनीची खरेदी आणि सर्वांचे अधिकार यांविषयी अधिवक्त्यांचे मार्गदर्शन घ्यावे !

साधकांना एकत्रित भूमी घेऊन खेडेगावांमध्ये शेतजमिनीवर बांधकाम करायचे असेल, तर त्यांनी पुढील कृती कराव्यात.

अ. एका साधकाने २० सहस्र चौरस फुटाची जमीन विकत घेऊन ती ‘बिगरशेती (N.A. नॉन अ‍ॅग्रिकल्चरल लँड)’ करून घ्यावी.

आ. सरकारी नियमांनुसार त्यात ‘प्लॉट’ पाडावे.

इ. त्यानंतर जागेच्या संदर्भात मालकी हक्क कायदेशीर होण्याच्या दृष्टीने अधिवक्त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यावर बांधकाम करावे किंवा ‘बिगरशेती केलेले ‘प्लॉट’ विकत घेऊन त्यावर बांधकाम करावे.

४. नवीन भूमी खरेदी करतांना आणि त्यावर वास्तू बांधतांना वास्तुशास्त्राच्या दृष्टीने खालील सूत्रांचा विचार करावा !

अ. ‘भूखंडाचा आकार चौकोनी किंवा आयताकृती असावा.

आ. भूखंड सर्व बाजूंनी सपाट असल्यास तो घर बांधण्यास चांगला असतो.

इ. भूखंडाला उतार असल्यास तो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. चढ असल्यास तो दक्षिण किंवा पश्‍चिम दिशेला असावा.

ई. दक्षिण किंवा पश्‍चिम दिशेला तलाव किंवा नदी असलेला, तसेच पूर्व किंवा उत्तर दिशेला डोंगर असलेला भूखंड घेऊ नये.

उ. भूखंडाचे मुख शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.

ऊ. घर बांधतांना ते चौकोनी किंवा आयताकृती बांधावे.

ए. भूखंडाच्या नैऋत्य कोपर्‍यात घर बांधावे, म्हणजेच पूर्व आणि उत्तर भागात मोकळी जागा अधिक सोडावी.

ऐ. मुख्य प्रवेशद्वार आणि प्रांगण प्रवेशद्वार : वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी चारही दिशांचा विचार केला आहे. त्यातही उत्तर आणि पूर्व दिशांना अधिक महत्त्व दिले आहे.

ओ. मुख्य प्रवेशद्वारास लाकडी उंबरा असावा.

औ. घर बांधतांना अधिकतर वास्तुशास्त्रानुसार घर बांधावे, उदा. ईशान्येला देवघर, पूर्व अथवा उत्तर दिशेला बैठक कक्ष, आग्नेय दिशेला स्वयंपाकघर करावे अन् ‘पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करता यावा’, अशी रचना करावी. नैऋत्येला शयनकक्ष असावा आणि झोपतांना दक्षिण दिशेकडे डोके करून झोपावे. पश्‍चिम अथवा दक्षिण भागात शौचालय बांधावे.

अं. पाण्यासाठी कूपनलीका (बोअरवेल), विहीर किंवा भूमीखाली (अंडरग्राउंड) पाण्याची टाकी करायची असल्यास ती ‘पूर्व ते ईशान्य’ किंवा ‘उत्तर ते ईशान्य’ या भागात घ्यावी. ईशान्य दिशेच्या अगदी कोपर्‍यात घेऊ नये.

क. ‘सेप्टीक टँक’ पश्‍चिम-मध्य ते वायव्य भागात करावा.’

– श्री. धनंजय कर्वे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

५. अल्पावधीत आणि न्यूनतम व्ययात गावात घर बांधायचे असेल, तर काय करावे ?

श्री. मधुसूदन कुलकर्णी

गावात घराची व्यवस्था करतांना घर बांधण्याऐवजी तयार घर विकत घेण्यास प्राधान्य द्यावे. अपेक्षित असे तयार घर मिळत नसल्यास घर बांधण्याचा निर्णय घेता येईल. ‘न्यूनतम व्ययात आणि अल्पावधीत घर कसे बांधावे ?’, या संदर्भातील सूत्रे पुढे दिली आहेत.

५ अ. बांधकामापूर्वी करावयाच्या कृती

१. आपत्काळाचा विचार करता ‘कोणत्या गावातील भूमी निवडणे योग्य ठरेल ?’, याचे निकष अभ्यासून उत्तरदायी साधकांच्या मार्गदर्शनानुसार योग्य त्या गावी भूमी निवडावी.

२. बांधकाम भक्कम होण्याकरता घराच्या पायासाठी कडक मुरूम असणे आवश्यक आहे. जमिनीत २ फूट उंचीचा खड्डा खणल्यावर कडक मुरूम लागेल, अशी भूमी निवडावी. यामुळे पाया बळकट होऊन घराचे बांधकाम भरभक्कम होते.

३. भूमीचा नकाशा धर्मप्रचारक संत किंवा ६१ टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या, पण वाईट शक्तींचा त्रास नसलेल्या आणि सूक्ष्मातील कळणार्‍या साधकाला दाखवावा. नकाशा पाहून चांगली स्पंदने जाणवत असल्यास भूमी खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. (या संदर्भातील विस्तृत सूचना यापूर्वी प्रसिद्ध झाली आहे.)

४. ‘घरी किती जण रहाणार आहेत ? त्यांच्या आवश्यकता काय ?’, यांचा विचार करून खोल्यांची संख्या ठरवावी.

५. आपत्काळाच्या दृष्टीने आवश्यकता म्हणून घर बांधत असल्याने सर्व सोयी-सुविधांऐवजी अत्यावश्यक अशा जीवनावश्यक सुविधांचा विचार करावा.

६. ‘घराचे प्रवेशद्वार, तसेच अन्य खोल्या कोणत्या दिशेला असाव्यात ?’, या संदर्भात वास्तूशास्त्रज्ञाचे मार्गदर्शन घ्यावे. आपल्या संपर्कातील वास्तू विषारदाला संपर्क करून त्याच्याकडून घराचा नकाशा काढून घ्यावा.

५ आ. प्रत्यक्ष बांधकामाच्या संदर्भात

१. घराचे बांधकाम ‘आर्.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चर’ किंवा ‘लोड बेअरिंग स्ट्रक्चर’चे असावे.

२. शक्यतो ‘स्लॅब’चे घर बांधावे. भिंतींना आतील बाजूने ‘निरू फिनिश’, तर बाहेरील बाजूने ‘स्पंज गिलावा’ करावा.

३. जोत्याची उंची रस्त्यापासून २ फूट वर असावी. खोलीची उंची लादीपासून छपरापर्यंत (‘स्लॅब’च्या वरील टोकापर्यंत) १० फूट ठेवावी.

४. स्वयंपाकघरात ५ फूट (लांबी) × सव्वा दोन फूट (रुंदी) × अडीच फूट (उंची) या आकाराचा कडाप्प्यापासून बनवलेला ओटा (कट्टा) करावा. त्यात ‘स्टिलचे सिंक’ बसवावे. संगमरवरी (मार्बलचा) ओटा करू नये.

५. ‘घरात सरपटणारे प्राणी येऊ नयेत’, यासाठी प्रत्येक दाराच्या चौकटीला उंबरा बसवावा.

५ इ. नळजोडणी

१. पंपापासून टाकीपर्यंत आणि तिथून आतपर्यंतची नळजोडणी चांगल्या गुणवत्तेची पाईप आणि ‘प्लंबिंग फिटिंग्ज’ (नळजोडणीसाठी आवश्यक अशी लहान-मोठी सामग्री) वापरून करावी. ‘पाईपलाईन’साठी देण्यात येणारी मुख्य तोटी (कॉक) सहज चालू-बंद करता येईल, अशा ठिकाणी लावावी.

२. निचर्‍याची (ड्रेनेजची) व्यवस्था नसल्यास घराच्या बाहेरील बाजूला ६ फूट (लांबी) × ४ फूट (रुंदी) × ६ फूट (उंची) या आकाराचा ‘सेप्टिक टँक’ बसवावा. त्याची बाहेरील भिंत ९ इंच जाडीची, तर आतील भिंत (कप्पे) ६ इंच जाडीची असावी. सांडपाणी वाहून नेण्यासाठीही चांगल्या गुणवत्तेची पाईप आणि फिटिंग्ज वापरावी. जेणेकरून भविष्यात देखभाल-दुरुस्तीची अडचण येणार नाही.

३. प्रसाधनगृहातून, तसेच स्वयंपाक घरातून येणारे पाणी या टाकीला जोडू नये. या पाण्यासाठी एक वेगळा खड्डा करून त्यात विटांचे काही तुकडे घालावेत (याला ‘शोषखड्डा (सोक पिट)’ असे म्हटले जाते.) आणि त्यात पाणी मुरवावे.

५ ई. सुतारकाम

१. घराचे मुख्य द्वार आणि खोल्यांची अन्य दारे लाकडाची असावीत. स्नानगृह आणि शौचालय यांना ‘फायबर’ची दारे बसवावीत. तेथे लाकडी दारे बसवू नयेत.

२. ‘स्लायडिंग’च्या खिडक्या करण्यासाठी अधिक व्यय येत असल्याने तशा खिडक्या न करता नेहमीप्रमाणे लाकडाच्या खिडक्या कराव्यात.

३. घरात वेगळी कपाटे न करता भिंतींनाच कपाटे करावीत.

६. अन्य

अ. घराला आतील बाजूने ‘ड्राय डिस्टेंपर’, तर बाहेरील बाजूने ‘सिमेंट कलर’ लावावा.

आ. खाली जमिनीला लाल रंगात सिमेंटचा कोबा करावा, अथवा १ × १ फुटाची ‘सिरॅमिक’ लादी, तसेच आतील भिंतीच्या तळाला ४ इंच उंचीचे सिरॅमिक लादीचे ‘स्कर्टिंग’ करावे.

इ. घरात आवश्यकतेप्रमाणे भारतीय पद्धतीचे किंवा विदेशी पद्धतीचे (कमोड) शौचालय बसवावे.

ई. घरातील विद्युत् जोडणी ‘कन्सील वायरिंग’ (भिंतींमधून विद्युत् तारांची जोडणी करणे) पद्धतीने न करता ‘केसिंग कॅपिंग’ने करावी. (हा विद्युत जोडणीचा सर्वांत सोपा प्रकार आहे. ‘पीव्हीसी इन्सुलेटेड तारा’ ‘प्लास्टिकच्या केसिंग’मध्ये ठेवल्या जातात आणि टोपीने झाकल्या जातात. याला ‘केसिंग कॅपिंग’ म्हटले आहे.)

उ. सर्वसाधारणपणे एका व्यक्तीला प्रतिदिन वापरासाठी आणि पिण्यासाठी मिळून १०० लिटर पाणी लागते. या अंदाजाने घरात ५ व्यक्ती असल्यास ७५० लिटरची प्लास्टिकची गोल टाकी स्लॅबवर बसवावी. एखाद्या दिवशी पाण्याचा पुरवठा न झाल्यास ‘अडचण येऊ नये’, यासाठी पाण्याच्या एकूण वापरापेक्षा दीडपट अधिक क्षमतेची टाकी बसवावी.

ऊ. आपत्काळात ‘सरकारी संस्थांना वीज आणि पाणी यांचा पुरवठा करणे अडचणीचे होऊ शकते’, असा विचार करून त्यांची वेगळी व्यवस्था करावी. आपत्काळात ज्या ठिकाणी रहाण्याचे नियोजन करू, तेथे वीज निर्माण करण्याची व्यवस्था करावी, म्हणजे ‘सोलर पॉवर सिस्टीम’ बसवावी. पाण्यासाठी आपल्या जागेमध्ये विहीर खणावी किंवा कूपनलिकेवर हातपंप बसवून पाणी उपसण्याची व्यवस्था करावी.

७. घर बांधण्यासाठी येणारा अंदाजे व्यय आणि लागणारा अवधी

८०० चौरसफूट क्षेत्राचे वरीलप्रकारे घर (हॉल, स्वयंपाकघर आणि २ खोल्या) बांधावयाचे असल्यास येणारा अंदाजे व्यय १२ ते १४ लाख एवढा आहे. घरासाठी जमीन खरेदी करण्याचा वेगळा व्यय येईल. गावाप्रमाणे हा व्यय अल्प-अधिक होऊ शकतो.

असे घर अल्पावधीत बांधता येते. घर बांधणीसाठी लागणारा कालावधी अधिकाधिक ४ मास एवढा आहे.

साधकहो, आपत्काळ दिवसेंदिवस समीप येत आहे. काळाची भीषणता लक्षात घेता भगवान श्रीकृष्णावर अनन्य निष्ठा ठेवून वरील सर्व प्रक्रिया (नवीन ठिकाण शोधणे, तेथे घर घेणे किंवा बांधणे आदी) पुढील ५ मासांत शीघ्रातिशीघ्र गतीने पूर्ण करा ! गावात निवासाची व्यवस्था केली, तरी सध्या तेथे स्थलांतरित होऊ नये.

८. ‘बांधकाम कोणत्या प्रकारचे करावे ?’, यासाठी काही दिशादर्शक सूत्रे

आर्.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चर या प्रकारचे मजबूत पद्धतीचे घर

८ अ. मजबूत पद्धतीचे आणि नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण करणारे ‘आर्.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चर’ ! : ‘आर्.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चर’ या प्रकारचे बांधकाम बळकट, टिकाऊ आणि सुरक्षित असते. यावर भूकंपाचा परिणाम न्यूनतम होतो. त्याचप्रमाणे आग आणि विजेचा झटका यांपासूनही ते सुरक्षित असते. त्यामुळे या प्रकारचे बांधकाम करणे चांगले ! एका माळ्याचे बांधकाम करण्यासाठी ४ मासांचा कालावधी लागू शकतो; मात्र त्यासाठी जमीन सपाट आणि कडक मुरूम असलेली असावी. त्यामुळे अल्प वेळेत बांधकाम होते. डोंगराळ भागात काम करायचे असल्यास अधिक वेळ लागतो. तो ६ मासापर्यंतही वाढू शकतो; पण एकंदरितच प्रचंड पाऊस किंवा भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींपासून या प्रकारच्या बांधकामात संरक्षण होते.

लोड बेअरिंग स्ट्रक्चर पद्धतीने अल्प व्ययात बांधलेले घर

८ आ. ‘लोड बेअरिंग स्ट्रक्चर’

८ आ १. ‘लोड बेअरिंग’ या पद्धतीने घरे सुटसुटीत, अल्प व्ययात आणि वेळेत बांधून होऊ शकणे : या बांधकामामध्ये भिंतींवर ‘स्लॅब’चा किंवा पत्र्याचा भार दिला जातो. यात बाहेरील भिंती जाड (रूंद) बांधल्या जातात. त्यामुळे ‘बिल्ट-अप एरीया’ वाढतो. घर बांधणार असलेल्या जागेच्या आसपास चांगली वीट तयार करणार्‍या विटांच्या भट्ट्या असतील आणि या विटा स्वस्त पडत असतील, तर ‘लोड बेअरिंग स्ट्रक्चर’नुसार बांधकाम करणे केव्हाही चांगले ! जिथे वरचा माळा बांधायचा नाही, अशा ठिकाणीही ही घरे सुटसुटीत, अल्प व्ययात आणि वेळेत बांधून होतात. एका माळ्याचे बांधकाम करण्यासाठी ३ ते ५ मासांचा कालावधी लागू शकतो; मात्र ती जमीन सपाट आणि कडक मुरूमाची हवी. पायाचा मुरूम कडक नसेल, तर मात्र ‘आर्.सी.सी. फ्रेम’चा विचार करावा.

८ आ २. ‘लोड बेअरिंग स्ट्रक्चर’च्या घरांवर उन्हाळा किंवा थंडी यांचा परिणाम होऊ शकणे : ‘लोड बेअरिंग’ किंवा ‘आर्.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चर’मध्ये वर छतासाठी पत्रे किंवा मंगलोरी कौले घालू शकतो. ‘या घराची उंची न्यूनतम १० फूट ठेवल्यास घरात हवा व्यवस्थित खेळती राहून तापमान नियंत्रित रहाते. अशा प्रकारची घरे पावसात योग्य असली, तरी उन्हाळा किंवा थंडी यांचा परिणाम त्यावर होऊ शकतो.

८ आ ३. मातीची घरे (‘लोड बेअरिंग स्ट्रक्चर ईन मड मॉर्टर’) : काही वेळेला घर बांधावयाच्या आसपास बांधकाम करण्यासाठीची पांढरी माती मुबलक आणि अल्प मूल्यात उपलब्ध होते. त्या वेळी पक्क्या विटांचे बांधकाम करतांना या मातीचा वापर विटांतील दर्जा (मॉर्टर) भरण्यासाठी करता येतो; पण याच्या भिंती नेहमीपेक्षा जाड घ्याव्या लागतात. येथे छतासाठी पत्रे किंवा मंगलोरी कौले घालू शकतो. यासाठी येणारा व्ययही सिमेंट आणि वाळू वापरून करावयाच्या बांधकामापेक्षा २५ ते ३० टक्क्यांपर्यंत न्यून होऊ शकतो.

८ इ. वापरात येऊ शकणार्‍या भूमीचा विचार केल्यास दोन्ही प्रकारच्या बांधकामाचा व्यय सारखाच असणे : ‘आर्.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चर’ आणि ‘लोड बेअरिंग स्ट्रक्चर’ अशा प्रकारच्या बांधकामासाठी येणारा व्यय एकसारखाच होतो.

१. ८०० चौरस फूट जमिनीवर ‘आर्.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चर’नुसार बांधकाम केले, तर ७०० चौरस फूट ‘कार्पेट एरिया’ (‘घरामध्ये वापरण्यासाठी मिळणारे चटईक्षेत्र’) मिळतो.

२. ८०० चौरस फूट भूमीवर ‘लोड बेअरिंग स्ट्रक्चर’नुसार बांधकाम केले, ६४० चौरस फूट ‘कार्पेट एरिया’ मिळू शकतो. (कारण याच्या भिंतींची जाडी अधिक रूंद असते.)

यावरून ‘दोन्ही प्रकारच्या घरांच्या बांधकामाच्या खर्चामध्ये अधिक फरक रहात नाही’, असे लक्षात येते. त्यामुळे बळकट, टिकाऊ आणि न्यूनतम व्यय होण्यासाठी ‘आर्.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चर’ने घर बांधलेले केव्हाही चांगले !

कंटेनरचा उपयोग करून सिद्ध केलेले घर (प्री-फॅब्रिकेटेड हाऊस)

८ ई. कंटेनर (प्री-फॅब्रिकेटेड हाऊस)

८ ई १. ‘कंटेनर’चा वापर घरासाठी केला जाणे : ‘कंटेनर’ विकत घेऊन त्यामध्ये घर सिद्ध करणे’, यासाठी बोटींवर वापरले जाणारे ‘कंटेनर’ वापरले जातात. या ‘कंटेनर’मध्येच आपल्या आवश्यकतेनुसार घराचा आराखडा (नकाशा) बनवला जातो आणि ते घर सिद्ध करून वापरले जाते. अशा घरांच्या उभारणीसाठी एक ते दीड मास कालावधी लागूू शकतो. या घराचा सर्व दृष्टीकोनातून विचार केला, तर पुढील सूत्रे लक्षात येतात.

अ. ही घरे लोखंडाच्या पत्र्यापासून बनवली असल्यामुळे या घरांचे आगीपासून संरक्षण होत नाही.

आ. घराला विजेचा झटका (शॉक) बसू शकतो आणि त्यामुळे आतील माणसे मृत्यूमुखी पडू शकतात.

इ. अती पाऊस झाल्यास या प्रकारच्या घरांना गंज चढू शकतो. त्यात गळती चालू होऊ शकते. हा गंज काढण्यासाठी सातत्याने ‘मेंटेनन्स’ करावा लागतो.

ई. या घरांच्या बाहेरील बाजूच्या पत्र्याची जाडी आणि एकंदर वजन अल्प असते. त्यामुळे जोराच्या वादळात हे घर त्याची मूळ जागा सोडण्याची शक्यता निर्माण होते.

उ. ‘पुष्कळ उन्हाळा किंवा प्रचंड थंडी आहे’, अशा भागांमध्ये या प्रकारची घरे त्या परिस्थितीला अनुकूल ठरत नाहीत. त्यामुळे या घरात रहाणार्‍या व्यक्तींच्या आरोग्याला धोका पोचतो.

८ ई २. नेहमी रहाण्याच्या दृष्टीने ही घरे फार उपयोगी नसून त्यांच्या उभारणीचा व्ययही अल्प नसणे : काहींच्या मते ‘या घरांना ‘इन्सुलेशन’ असले, तर त्रास होणार नाही; पण ‘इन्सुलेशन’ असले, तरी माणसाचे आरोग्य व्यवस्थित रहाण्यासाठी ज्या जाडीच्या भिंती हव्या, त्या तेवढ्या जाडीच्या नसल्यामुळे ‘ही घरे फार उपयोगी आहेत’, असे वाटत नाही. त्यामुळे साधकांनी अशी घरे विकत घेतांना किंवा बांधतांना या सगळ्याचा विचार करून निर्णय घ्यावा. ‘या घराच्या उभारणीसाठी प्रती चौरस फूट येणारा व्यय फार अल्प आहे’, असेही नाही. ‘लोअर मिडल क्लास किंवा कामगारांसाठीच्या छावण्या’ यांसाठी या प्रकारची घरे बांधलेली असतात’, असे सर्वेक्षण केल्यावर लक्षात आले.

८ उ. भिंती आणि ‘स्लॅब’ आधीच सिद्ध करून बांधलेली प्रि-कास्ट घरे : ‘काँक्रीट’मध्ये पूर्वीच तयार केलेल्या भिंती आणि ‘स्लॅब’ वापरून अशी घरे बांधली जातात. ‘क्रेन’च्या साहाय्याने हे साहित्य जागेवर आणून बसवले जाते.

१. यांच्या भिंती फार जाड नसतात. त्या दर्जात्मक नसतील, तर मोठ्या पावसात या भिंतींना ओल धरण्याची शक्यता असते.

२. एखाद दुसरे घर बांधतांना त्यासाठी अधिक व्यय होतो; पण अधिक घरे बांधायची असल्यास व्यय न्यून होतो.

३. घरे एकमेकाला लागून असल्यास ही घरे बांधण्याचा लाभ होतो; कारण दोन घरांमधील भिंती ‘कॉमन वॉल’ म्हणून घेतल्या जातात. त्यामुळे अल्प क्षेत्रामध्ये घराचे बांधकाम होते; पण यासाठी अधिक संख्येने घरे असणे आवश्यक आहे.

अशा प्रकारच्या घरांनाही ‘नगररचना कार्यालया’कडून अनुमती घ्यावी लागते. ही घरे बांधण्यासाठी ३ मासांचा कालावधी लागतो. ही घरे साधारण ५ वर्षांपर्यंत टिकतात.

अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या घरांचा अभ्यास पाहिला. साधकांनी ‘केवळ आपत्काळातच नाही, तर नंतरही ही घरे वापरता यावीत’, असा विचार करून बळकट, टिकाऊ आणि वीज किंवा पाऊस-वारा यांपासून सुरक्षा देणारे घर बांधावे.

आपत्काळाच्या संबंधीचे हे सर्व लिखाण परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने करता आले. यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

(समाप्त)

– श्री. मधुसूदन कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.२.२०२१)