संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांची माहिती
संभाजीनगर – येथील महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रामध्ये एका आधुनिक वैद्याने ‘पॉझिटिव्ह’ महिला रुग्णावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आल्याचे संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी सांगितले. या वेळी पडळकर म्हणाल्या की, या प्रकरणातील चौकशीत संबंधित आधुनिक वैद्य दोषी आढळले आहेत, तसेच महिलेला पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करण्यास सांगितले आहे. या महिलेचा भ्रमणभाष क्रमांक घेऊन संबंधित आधुनिक वैद्य तिला सतत संपर्क करत होते. ३ मार्च या दिवशी घडलेल्या या घटनेची माहिती प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
या वेळी भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी महिलेचा विनयभंग करणार्या आधुनिक वैद्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
प्रकरणाची सखोेल चौकशी करून कारवाई करू ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
ही घटना वाईट असून याचे कुणीही समर्थन करणार नाही. प्राथमिक चौकशी करून त्या आधुनिक वैद्याला बडतर्फ केले आहे. तरीही वरिष्ठांकडून याची सखोल चौकशी केली जाईल. पीडित महिलेचे नाव बाहेर न येता लवकरच संपूर्ण घटनेचा आढावा घेऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ४ मार्च या दिवशी दिली.
राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
ही घटना गंभीर असून राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्यातील ‘कोविड सेंटर’ येथे उपचारासाठी आलेल्या महिलांवर बलात्कार, त्यांचे विनयभंग केले जातात, ही दुर्दैवी गोष्ट आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना ४ वेळा पत्रे दिली आहेत, तरीही अशा घटना होत असतील आणि सरकार आमच्या पत्रांची नोंद घेणार नसेल, तर आम्ही न्याय कुठे मागायचा ?