राज्यपाल अभिभाषणावरील विधानसभेतील चर्चा…
मुंबई, २ मार्च (वार्ता.) – पुणे झालेल्या ‘एल्गार परिषदे’त हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याने ‘हिंदु समाज सडका आहे’, असे आक्षेपार्ह वक्तव्य करून हिंदूंवर टीका केली होती. अशा प्रकारे परिषदेत बोलता येत नाही, तरीही पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेहबूब शेख याने एका महिलेवर बलात्कार केला आहे’, असे ती महिला वारंवार सांगत असूनही त्याच्यावर कारवाई केली जात नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा नोंद केला जात नाही का ? येथील पोलिसांमध्ये शरजील आणि शेख यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत नाही का ? शरजील आणि शेख या दोघांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २ मार्च या दिवशी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना केली.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,
१. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सरकारी विमानात जाऊन बसले आणि त्यांना सांगितले जाते की, सरकारकडून विमान उडवण्याची अनुमती नाही. हा व्यक्ती नव्हे, तर राज्यपालपदाचा अवमान करण्यात आला आहे. प्रतिदिन ज्या राज्यपालांना अवमानित करतो त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव येतो, तेव्हा समाधान वाटते. मुख्यमंत्री कि राज्यपाल यांपैकी कुणाला विमान द्यायचे, तर राज्यपालांना विमान देतात. विमानात इंधन होते, तर अनुमती नसतांना ‘बोर्डिंग पास’ कसा मिळाला ? राज्यपाल विमानात जाऊन कसे बसले ?
२. राज्यपाल आणि सत्ताधारी यांच्यात मतभेद असतील; पण मनाचा इतका कोतेपणा चांगला नाही. मी राज्यपाल यांचे भाषण ऐकले आणि वाचले. त्यांचे भाषण कोणत्या श्रेणीत पडते ? आपली बाजू मांडतांना त्यात आकडे सत्य सांगितले पाहिजेत; पण ते दिसत नाही. राज्यपालांनी केलेल्या १२ पानी भाषणात मला कुठेही यशोगाथा दिसली नाही, तर वेदना आणि व्यथा दिसतात. जसे एखाद्या चौकात भाषण केले जाते, तसेच भाषण राज्यसरकारने राज्यपालांकडे पाठवले आहे. राज्यपालांचे अभिभाषणात पुढच्या १ वर्षात काय करणार आहे ? दिशा दाखवते; पण यात काहीच पहायला मिळत नाही. यमक जुळणारी भाषा यशाचे गमक होऊ शकत नाही.
३. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ असे होते; आता ‘माझे दायित्व’ ही मोहीम आहे, म्हणजे सरकारचे दायित्व नाही. सरकारने हात झटकले का ?
४. देशातील ४० टक्के कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनामुळे ३५ टक्के मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. तरीही सत्ताधारी कशाची पाठ थोपटून घेतात ? आता रुग्णसंख्या खरी आहे कि वाढवली. आज ज्याच्या मनात येतो, तो मंत्री आणि अधिकारी जाऊन ‘दळणवळण बंदी’ करतो. ‘दळणवळण बंदी’ करण्यासाठी सगळे सिद्ध झाले आहेत.
५. आपल्या अपयशाचा लेखोजोखा समोर येईल या भीतीने सरकारने आकडेवारी लपवली आहे. ‘जंबो कोविड सेंटर्स’मध्ये कुणाकुणाची घरे भरली याची माहिती दिली असती, तर बरे वाटले असते.