सुरूर (जिल्हा सातारा) येथे पारध्यांच्या आक्रमणात ४ जण घायाळ

सुरूर परिसरातील महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण

सुरूर येथे ग्रामस्थांच्या बैठकीत बोलताना शीतल जानवे- खराडे व पोलीस

सातारा, १ मार्च (वार्ता.) – वाई तालुक्यातील सुरूर येथील पारधी समाजातील जक्कल रंगा काळे यांनी मोहडेकरवाडी, सुरूर बेघरवस्ती आणि धावजी पाटील मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांवर आक्रमण केले. यामध्ये ४ जण घायाळ झाले आहेत.

सुरूर येथे पारधी वस्ती आहे. गत अनेक वर्षांपासून जक्कल रंगा काळे हे या वस्तीमध्ये रहातात. काळे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता वाई बसस्थानकावर एका प्रवासी कुटुंबावर आक्रमण केले; मात्र त्या कुटुंबाने काळे यांना कोणताही विरोध न करता ते तेथून निघून गेले. याच दिवशी बेघर वस्तीवरील एकावर तीक्ष्ण वस्तूने आक्रमण करत त्यांना काळे यांनी घायाळ केले. तसेच सुरूर येथील धावजी पाटील मंदिरात पौर्णिमेनिमित्त गर्दी असते. या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांवरही त्यांनी आक्रमण केले आणि त्यांना घायाळ केले. भीतीमुळे महिला पळाल्या, याविषयी कुठेही वाच्यता न करताच त्या स्वत:च्या गावी निघून गेल्या; मात्र प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती महिलांच्या गावातील नागरिकांना दिली. त्यामुळे गावातील अनेक युवकांनी सुरूर गावाकडे धाव घेतली. या वेळी अनुमाने २५० ते ३०० जणांचा जमाव जक्कल काळे यांना पकडण्यासाठी सुरूर येथील पारधी वस्तीवर चालून गेला; मात्र जमाव येत असल्याचे कळताच जक्कल काळे यांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच वाई येथील उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे-खराडे यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. या वेळी सुरूर येथील भैरवनाथ मंदिरात बैठक घेण्यात आली. जमावाला शांत करत त्यांना शांततेचे आवाहन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी पारधी समाजापासून होणार्‍या त्रासाचा पाढाच पोलिसांसमोर वाचून दाखवला. (पोलिसांना हे सांगावे का लागते ? नागरिकांना एवढा त्रास होईपर्यंत पोलीस निष्क्रीय का रहातात ?  – संपादक) या वेळी ‘कोंबिंग ऑपरेशन’ करून जक्कल काळे यांना पकडण्याचे आश्‍वासन पोलिसांनी उपस्थितांना दिल्याचे समजते.