२५० रुपयांत खासगी रुग्णालयांमध्ये मिळणार कोरोनावरील लस !

नवी देहली – कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात लस घेण्यास पात्र व्यक्ती खासगी रुग्णालयातून कोरोनाची लस टोचून घेऊ शकतात. त्यासाठी एका डोसचे २५० रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामध्ये लसीची किंमत १५० रुपये असून १०० रुपये सेवेसाठी आकारण्यात येणार आहेत. खासगी रुग्णालये यापेक्षा अधिक शुल्क आकारू शकत नाहीत. ‘पुढील सूचना मिळेपर्यंत हेच शुल्क रहाणार आहे’, असे राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अतिरिक्त सचिव वंदना गुरनानी यांनी स्पष्ट केले. ‘सरकारी रुग्णालयांमध्ये लसीकरण विनामूल्य रहाणार आहे’, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. १ मार्चपासून दुसर्‍या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. त्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच इतर आजार असलेले ४५ वर्षांवरील नागरिक लस घेऊ शकतात. लस घेण्यासाठी जातांना आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा सरकारने दिलेले ओळखपत्र समवेत नेणे आवश्यक आहे. तसेच इतर आजार असलेल्या ४५ ते ५९ या वयोगटातील नागरिकांसाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.