(म्हणे) ‘मुसलमानांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा कधीही अधिक होऊ शकणार नाही !’ – माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त एस्.वाय कुरेशी

मुसलमानांची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि हिंदूंना कट्टरतावादी दाखवण्याचा माजी मुसलमान अधिकार्‍याचा डाव !

  • भारतामध्ये मुसलमान १८ टक्के आहेत, यात आणखी १० ते १२ टक्के जरी वाढ झाली, तर ते आणखी एका फाळणीची मागणी करतील, अशी भीती मागील फाळणीचा इतिहास पहाता हिंदूंना वाटते. त्यामुळे त्यांची हिंदूंपेक्षा अधिक लोकसंख्या होण्याची आवश्यकता नाही. हे पहाता कुरेशी यांचा दावा लोकांची दिशाभूल करण्याचा आहे, हेच लक्षात येते !
  •  कुरेशी हिंदूंना खोटे पाडण्याचा आणि त्यांच्या समाजाला ‘पीडित’ म्हणून रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुधारणावादाची झूल पांघरून हिंदूंना लक्ष्य करू पहाणार्‍या अशा धर्मांधांपासून हिंदूंनी सावध रहाणे आवश्यक !
एस्.वाय. कुरेशी

नवी देहली – हिंदु कट्टरतावादी आरोप करतात की, मुसलमानांची लोकसंख्या वाढवणे हे एका षड्यंत्राचा भाग आहे. यातून ते भारतावर नियंत्रण मिळवू इच्छित आहेत; मात्र मला वाटते की, मुसलमान कधीही हिंदूंच्या लोकसंख्येच्या पुढे जाऊ शकणार नाहीत. गेल्या ६० वर्षांमध्ये हिंदू ८४ टक्क्यांवरून ७९ टक्के आणि मुसलमान ९ वरून १४ टक्के झाले, तरी सध्या मुसलमान कुटुंब नियोजन करत असल्याने वर्ष २१०० मध्ये मुसलमान १८ टक्क्यांपेक्षा अधिक होऊ शकणार नाहीत, असा दावा माजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त एस्.वाय. कुरेशी यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. कुरेशी यांचे नवे पुस्तक ‘द पॉप्युलेशन मिथ : इस्लाम, फॅमिली प्लॅनिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया’मध्ये भारताच्या लोकसंख्येविषयी विश्‍लेषण केले आहे. यात त्यांनी इस्लाममध्ये कुटुंब नियोजन सांगण्यात आल्याचा दावा केला आहे. (कुराणमध्ये असे कुठे म्हटले आहे, हे कुरेशी यांनी सांगावे, तसेच या दाव्याविषयी मुसलमानांच्या धर्मगुरूंना काय म्हणायचे आहे, हेही जाणून घेणे आवश्यक ! – संपादक)

कुरेश यांनी मुलाखतीत म्हटले की,

१. खरे षड्यंत्र हिंदुत्वनिष्ठ संघटनांचेच आहे. अनेक हिंदु नेते हिंदूंना अनेक मुले जन्माला घालावेत, असे आवाहन करत आहेत. ‘आम्ही ५ आमचे ५०’ अशा प्रकारच्या घोषणा आमच्या विरोधात दिल्या जात आहेत. मी आव्हान देतो की, एकातरी मुसलमानाला समोर आणा की, ज्याच्या ५ बायका आहेत आणि त्याला २५ मुले आहेत. (हिंदु कुटुंबांना असे आवाहन करण्याची वेळ का आली ? हिंदूंना कुणामुळे भारतात असुरक्षित वाटते, हे जगजाहीर आहे. बहुपत्नी असणारे अनेक मुसलमान समाजात आहेत. कुरेशी यांना ते दिसत नसतील, तर आता सरकार यंत्रणांनी पुढे येऊन त्यांना अशा मुसलमानांची ओळख करून द्यावी ! – संपादक)

२. महंमद पैगंमर यांच्या वेळेला त्यांनी एका व्यक्तीला सांगितले होते की, जेव्हा संसाराचा खर्च पेलवू शकतो, तेव्हाच विवाह केला पाहिजे. बहुविवाहाचा विचार केला, तर मुसलमानांमध्ये पुष्कळ अल्प बहुविवाह होतात. जेव्हा महिला अनाथ आहे आणि स्वतःचा उदर निर्वाह करू शकत नाही आणि पुरुष ते करू शकतो, तेव्हा तो तिच्याशी एक पत्नी असतांना दुसरा विवाह करू शकतो. बहुविवाहाला इस्लाम या एकाच अटीवर मान्यता देतो. असे असतांना काही लोकांनी ‘याला बहुविवाहाची अनुमती आहे’, असा अर्थ घेतला आहे; मात्र तो चुकीचा आहे. तसेच एकाच व्यक्तीने अनेक विवाह केले, तर दुसर्‍या पुरुषाला मुली मिळणे कठीण जाईल.

३. २५ वर्षांपूर्वी मला वाटत होते की, इस्लाम कुटुंब नियोजनाच्या विरोधात आहे; मात्र मी जेव्हा इस्लामचा अभ्यास केला, तेव्हा कुराणमध्ये याउलट माहिती मिळाली.