प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव हवे !

मराठी भाषा गौरवदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे संबोधन

मुंबई – मराठी भाषा ही छत्रपती शिवरायांची भाषा आहे. छत्रपती शिवरायांनी फारसी भाषेतील शब्दांना मराठी प्रतिशब्द असणारा शब्दकोश सिद्ध केला. त्यांच्यामुळेच आपण हा दिवस पाहू शकत आहोत. आपणही शासकीय अवघड शब्द पालटून तेथे सोपे शब्द आणण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्यात एकच पुस्तकांचे गाव का आहे ? प्रत्येक जिल्ह्यात असे पुस्तकांचे एक गाव हवे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मराठी भाषा गौरवदिनानिमित्त आयोजित राज्याला संबोधित करतांना बोलत होते.

या निमित्त विधीमंडळ आणि अन्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘मातृभाषेत बोलणे, विचार व्यक्त करणे म्हणजे कमीपणा नव्हे. आपण त्याला कमीपणा मानतो. हा न्यूनगंड आपल्यातून जात नाही, तोपर्यंत कितीही आकांत केला, तरी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नाही. पुढच्या मराठी भाषा गौरवदिनापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल. मराठीला अभिजात सर्वोच्च भाषेचाच दर्जा मिळाला पाहिजे.’’