तापमान वाढल्यामुळे पुढे मानवजात जिवंत रहाणार नाही !
जालना – पृथ्वीवरील कार्बन दिवसेंदिवस वाढत असून वर्ष २०२४ मध्ये याचा मोठा धोका निर्माण होईल. त्यामुळे आतापासूनच या संकटाला पळवून लावण्यासाठी कामाला लागा आणि पृथ्वीवरील कार्बन अल्प करण्यासाठी बांबूची लागवड करा, असे आवाहन पर्यावरण अभ्यासक तथा कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर उपस्थित होते.
पृथ्वीवरील कार्बन कमी करण्यासाठी बांबूची लागवड करा – पाशा पटेल
Posted by ETV Bharat Maharashtra on Friday, February 19, 2021
पाशा पटेल पुढे म्हणाले की, वर्ष २०१५ मध्ये पॅरिस करार झाला होता. या कराराच्या वेळी जगातील २०० देशांचे पंतप्रधान आणि प्रमुख उपस्थित होते. त्यांच्यासमवेत शास्त्रज्ञांचीही उपस्थिती होती. या वेळी या सर्वांनी एक चिंता व्यक्त केली, ती म्हणजे ‘पृथ्वीवर आता मानवजात जिवंत रहाणार नाही’; कारण पृथ्वीवरचे तापमान आणि कार्बन हे दोन्ही वाढत आहे. वर्ष २०२४ मध्ये पृथ्वीचे तापमान वाढणार आहे आणि ज्या दिवशी ते अडीच अंशाने वाढेल, त्या दिवशी पृथ्वीवर माणूस जगणार नाही, अशी भीतीही या कराराच्या वेळी व्यक्त करण्यात आली होती. असे होऊ द्यायचे नसेल, तर आपल्याला तापमान अल्प करावे लागेल आणि त्यासाठी झाडे वाढवणे आवश्यक आहे.