नक्षलग्रस्त भागातून पुरवठा होत असलेला साडेतीन कोटी रुपयांचा गांजा विक्रोळी (मुंबई) येथे जप्त, २ जणांना अटक

गांजाची शेती करून नक्षलवाद्यांची राष्ट्रविरोधी मोहीम

विविध माध्यमातून राष्ट्रविरोधी कारवाया करणारे नक्षलवादी आणि त्यांना सहकार्य करणारे राष्ट्रद्रोही यांचा कसून शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !

पकडलेल्‍या आरोपींसोबत पोलीस

मुंबई – गांजाची शेती करून नक्षलवाद्यांनी राष्ट्रविरोधी मोहीम चालू केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. १३ फेब्रुवारी या दिवशी विक्रोळी येथून १ सहस्र ८०० किलो गांजा अमली पदार्थविरोधी पथकाने जप्त केला असून हा गांजा नक्षलग्रस्त भागातून पुरवण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र आणि अन्य राज्यांत प्रती मासाला अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात गांजाचा पुरवठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार या कारवाईतून उघड झाला आहे. या गांजाचे मूल्य साडेतीन कोटी रुपये इतके असून या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

१. गुन्हेगारी अन्वेषण शाखेचे सहआयुक्त मिलन भारंबे यांनी याविषयी माहिती देतांना म्हटले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दिनेश सरोज आणि आकाश यादव अशी आहेत.

२. आकाश यादव याच्या विरोधात यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

३. याप्रकरणी संदीप सातपुते आणि लक्ष्मी प्रधान या २ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. संदीप सातपुते हा भिवंडीतील एका गोदामाचा मालक असून तो ठाणे येथील लुईसवाडी परिसरात मागील ५ वर्षांपासून स्थानिक पातळीवर गांज्याचा पुरवठा करत आहे, तर प्रधान हा आंध्रप्रदेश येथे रहाणारा असून नक्षलग्रस्त भागातून मोठ्या प्रमाणात गांजाचा पुरवठा करतो.

४. काही लोक मुंबईमध्ये गांजा पोचवत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती.

५. त्यानंतर घाटकोपर येथील अमली पदार्थविरोधी पथकाने विक्रोळी येथील मुंबई-ठाणे येथील महामार्गावर सापळा रचून एक ट्रक अडवला. या ट्रकमध्ये नारळ भरलेले होते. या नारळांच्या खाली ट्रकमध्ये एक कप्पा सिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये गांजा लपवण्यात आला होता.

६. प्राथमिक अन्वेषणात अटक करण्यात आलेले आरोपी प्रती मासाला महाराष्ट्रात ६ टन गांजाचा पुरवठा करायचे. त्या पैकी ४ टन गांजाची विक्री केवळ मुंबईत होत होती. ओडिशा राज्यातून भाग्यनगर, सोलापूर आणि पुणे मार्गे गांजा मुंबईमध्ये आणला जात होता.

गांजाच्या शेतीची नक्षलवाद्यांची राष्ट्रविरोधी मोहीम

नक्षलवादी पैसे कमावण्यासाठी आणि स्वत:ची मोहीम चालू ठेवण्यासाठी गांजाची शेती करतात. आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि ओडिशा येथील जंगलात गांजाची शेती केली जाते. सहजरित्या कुणी पोचू शकणार नाही, असे ठिकाण ते निवडतात. याखेरीज डोंगरावरही लपूनछपून गांजाची शेती करतात, अशी माहिती मिलन भारंबे यांनी दिली. ओडिशा येथील पोलिसांनीही अशीच कारवाई केली असून नक्षलवादी करत असलेली गांजाची शेती त्यांनी उद्ध्वस्त केली आहे.