कणकवली – कोरोना महामारीच्या काळात कोकण रेल्वेमार्गावर धावणार्या गाड्यांच्या तिकिटांचे दर २० टक्के अधिक दराने आकारले जात आहेत. हे दर न्यून करून ते पूर्ववत् करावेत, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी रेल्वे महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात मुंबई-मडगाव-मुंबई अशी ‘विशेष रेल्वे’ चालू करण्यात आली. या गाडीच्या ‘स्लिपर कोच’, ‘थ्री-टायर एसी’, ‘टु-टायर एसी’ आणि ‘फस्ट क्लास’ या वर्गांच्या तिकिटांसाठी मूळ रकमेच्या २० टक्के अधिक आकारणी केली जात आहे. या मार्गावरून धावणार्या ‘कोकणकन्या’ एक्सप्रेस गाडीच्या वेळेतच ही ‘विशेष रेल्वे’ चालवली जात आहे. या ‘विशेष रेल्वे’च्या तिकिटांच्या दरात होणारी अधिकची आकारणी प्रवाशांना परवडणारी नाही. सध्या मुंबईतील ‘लोकल रेल्वे’ १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी चालू केल्या आहेत. त्याचप्रमाणे कोकण रेल्वेमार्गावर धावणार्या गाड्या नियमित चालू केल्या आहेत. कोरोनाच्या काळात केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी घातलेले बहुतांशी निर्बंध उठवलेले असून कोकण रेल्वेनेही ‘कोकणकन्या’ पूर्वीप्रमाणे नियमित चालू करून प्रवाशांकडून पूर्वीप्रमाणे भाडे घ्यावे.