शहरी नक्षलवादी विल्सन यांची निर्दोष मुक्त करण्याची याचिका

  • लॅपटॉपमध्ये पत्र ठेवल्याच्या अमेरिकी आस्थापनाच्या दाव्याचा आधार

  • एल्गार परिषदेतील कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंदवल्याचे प्रकरण

  • पंतप्रधानांची हत्या आणि देशविघातक कृत्य यांच्या कटासारख्या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर यायला हवे; मात्र या प्रकरणी अमेरिकेतील एका खासगी आस्थापनाने आरोपींना निर्दोष ठरवणारा अहवाल २ वर्षांनंतर सादर करणे, हे संशयास्पद आहे. यामध्ये काही देशविघातक शक्तींचा हात नाही ना ? याचीही चौकशी व्हायला हवी.
  • देशद्रोही शहरी नक्षलवाद्यांना अमेरिकेतूनही अशा प्रकारचे साहाय्य मिळत आहे, असाच याचा दुसरा अर्थ होतो !
  • पत्र हॅकरने भ्रमणसंगणकात टाकले, तर पूर्वीच संशय येऊन विल्सन यांनी त्याविषयी तक्रार का केली नाही ?
रोना विल्सन

मुंबई – अमेरिकेतील ‘अर्सेनेल कन्सल्टन्सी’ या खासगी आस्थापनाने रोना विल्सन यांच्या अटकेच्या २२ मास आधी त्यांचा लॅपटॉप (भ्रमणसंगणकात) ‘हॅक’ करून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाचे पत्र ‘प्लान्ट’ करण्यात आल्याचा दावा केला आहे. ‘अर्सेनेल कन्सल्टन्सी’ आस्थापनाच्या या दाव्याचा संदर्भ घेत आरोपी रोना विल्सन यांनी ‘या प्रकरणी स्वत:सह अन्य आरोपींना निर्दोष मुक्त करावे’, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. विशेष म्हणजे ‘अर्सेनेल कन्सल्टन्सी’ यांच्या अहवालाचे वृत्त अमेरिकेतील प्रसिद्धीमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.

१. वर्ष २०१८ मध्ये पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेनंतर पुणे पोलिसांनी रोना विल्सन यांसह अन्य आरोपींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या आणि देशविघातक कृत्ये यांचा कट केल्याच्या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी आतापर्यंत १६ जणांना पोलिसांनी अटक केली असून अद्याप कुणालाही जामीन मिळालेला नाही.

२. रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाचे पत्र सापडल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी रोना विल्सन यांसह एल्गार परिषदेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे; मात्र ‘अर्सेनेल कन्सल्टन्सी’ या आस्थापनाने केलेल्या दाव्यानंतर रोना विल्सन यांनी पुणे पोलिसांच्या आरोपाला न्यायालयात आव्हान दिले आहे.

३. ‘अर्सेनेल कन्सल्टन्सी’ आस्थापनाच्या दाव्यावरून रोना विल्सन यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे, ‘‘फॉरेन्सिक अहवालानुसार लॅपटॉपमधील लिखाण हॅकरने सेट केले. त्यामुळे त्यात १० चिथावणीखोर ई-मेल आहेत. त्यामध्ये या प्रकरणातील अन्य आरोपींचीही नावे आहेत. या प्रकरणी ‘हॅकर’च्या विरोधात कठोर कारवाई करावी. सर्व आरोपींना तत्काळ मुक्त करावे, तसेच त्यांच्यावरील सर्व गुन्हे रहित करावे.’’