वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाईच्या इशार्‍यानंतर ट्विटरकडून भारतविरोधी ७०९ खाती बंद

नाक दाबल्याविना तोंड उघडत नाही, हेच विदेशी आस्थापनांच्या संदर्भात लक्षात येते ! सरकारने आता ‘अ‍ॅमेझॉन’ आदींसारख्या विदेशी आस्थापनांचे तोंड दाबून त्यावरून होणारा हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखण्याचा प्रयत्न करावा, असे हिंदूंना वाटते !

नवी देहली – भारत सरकारने सुचवलेल्या ७०९ ट्विटर खात्यांवर ट्विटर आस्थापनाने कारवाई करत ती बंद केली आहेत. या खात्यांवरून भारताच्या विरोधात द्वेष पसरवत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारताने ट्विटरकडे केली होती; मात्र ट्विटरकडून टाळाटाळ होत असल्याचे पाहून भारताने ट्विटरच्या वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाईची चेतावणी दिल्यावर ट्विटरने ही कारवाई केली.

१. ‘ट्विटर इंडिया’ने केंद्र सरकारला हमी देतांना सांगितले की, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी अ‍ॅक्टच्या कलम ६९ अ (३) नुसार पाठवलेल्या नोटिसीत ज्या ट्विटर खात्यांचा उल्लेख केला आहे, त्या संबंधित खात्यांची तपासणी करण्यात येईल.

२. नोटिसीत सरकारने म्हटले होते की, आयटी अ‍ॅक्टच्या या कलमानुसार सरकारच्या सूचनांचे पालन न केल्यास ट्विटर इंडियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना ७ वर्षांपर्यंतचा कारावास आणि आर्थिक दंड भरावा लागू शकतो.

३. सरकारच्या निर्देशानंतर ट्विटरनेे जी ७०९ खाती बंद केली आहेत त्यामध्ये १२६ खात्यांमधील मजकुरात ‘पंतप्रधान मोदी शेतकर्‍यांचा वंशसंहार करण्याचा कट रचत आहेत’, असे म्हटले होते, तर ५८३ खाती खलिस्तानी आणि पाकिस्तान यांच्याशी संबंधित आहेत. या खात्यांद्वारे दिशाभूल करणारी माहिती आणि चिथावणीखोर मजकूर असल्याचे सरकारने म्हटले आहे.