म्यानमारमधील इक्बाल नावाच्या संशयित व्यक्तीची मालेगाव येथे भेट घेतल्याचे प्रकरण
मालेगाव (जिल्हा नाशिक) – येथील एम्.आय.एम्.चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांची चौकशी करण्याचा आदेश केंद्रीय गृहविभागाने राज्य सरकारला दिला आहे. काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांच्या तक्रारीवरून हा आदेश देण्यात आला आहे. म्यानमारमधील इक्बाल नावाची व्यक्ती ७ डिसेंबर २०१८ या दिवशी मालेगाव येथे आली होती. काही दिवस त्याचे मालेगाव शहरात वास्तव्य होते. इक्बाल हा संशयित व्यक्ती असून देश आणि शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याच्या वास्तव्याची चौकशी करावी, तसेच एखादी परदेशातील व्यक्ती मालेगाव शहरात येते आणि त्याची मालेगाव पोलिसांना माहिती नाही, असे अनेक प्रश्न आसिफ शेख यांनी उपस्थित करत थेट केंद्रीय गृहमंत्रालयाकडे चौकशीची मागणी केली होती. इक्बालने मालेगावमध्ये एका सोहळ्यात हजेरी लावल्यानंतर आमदार मौलाना मुफ्ती यांची भेट घेतली होती. इक्बालने आमदार मौलाना मुफ्ती यांची परदेशातही भेट घेतल्याची छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये फिरत आहेत.