घाटंजी (जिल्हा यवतमाळ) येथील आरोग्य केंद्रात पोलिओ डोसऐवजी १२ बालकांना सॅनिटायझर पाजले !

घटना लपवून ठेवण्याचा प्रयत्न

आरोग्याच्या संदर्भात एवढा हलगर्जीपणा करणार्‍यांना वैद्यकीय सेवक म्हणता येईल काय ? बालकांच्या जिवाशी खेळणार्‍या आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल !

घाटंजी (यवतमाळ), १ फेब्रुवारी (वार्ता.) – तालुक्यातील घाटंजी येथील कापसी-कोपरी या गावी प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ बालकांना पोलिओ डोसऐवजी  सॅनिटायझर पाजण्यात आले. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर परत त्या बालकांसमवेत पालकांना बोलावून पोलिओ डोस पाजण्यात आला आणि ही गोष्ट लपवून ठेवण्यात आली. रात्री बालकांना मळमळ, उलट्या होऊ लागल्यानंतर त्यांना यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. या प्रसंगाच्या वेळी जे समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या, त्यांपैकी कुणाकडून ही चूक झाली, याचे अन्वेषण चालू आहे.

(सौजन्य : ABP MAJHA)

रात्री १ वाजता जिल्हाधिकार्‍यांनी वैद्यकीय महाविद्यालयात भेट दिली. या घटनेची चौकशी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीकृष्ण पांचाळ करत आहे.