पुण्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरण
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून चौकशी का करत नाही ?
पुणे – येथील बोगस (खोटी) शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य आरोपी ज्योत्स्ना शिंदे यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नाव कलंकित झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी महापालिका कामकाजातही अफरातफर केल्याचा संशय बळावला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार करण्यात यावा. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद असल्यामुळे त्यांना निलंबित करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी करत त्यांचे संपूर्ण कामकाज आणि संपत्ती यांची चौकशी करण्याची मागणी शिवसेना चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोर्हाळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. निवेदनावर शिवसेना संघटक संतोष सौंदणकर यांचीही स्वाक्षरी आहे.
ज्योत्स्ना शिंदे यांची नियुक्ती करतांना त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा का विचार केला गेला नाही ? तसेच शिंदे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेला असतांनाही त्यांच्यावर कारवाई होत नाही, ही अत्यंत निंदनीय गोष्ट असल्याने याचा कोर्हाळे आणि संतोष सौंदणकर यांनी कडक शब्दांत निषेध केला आहे.