सरसंघचालक मोहनजी भागवत ३१ जानेवारीला तपोभूमीला भेट देणार

फोंडा, २९ जानेवारी – सरसंघचालक मोहनजी भागवत सध्या गोवा दौर्‍यावर आहेत. सरसंघचालक मोहनजी भागवत ३१ जानेवारी या दिवशी कुंडई येथील श्रीक्षेत्र तपोभूमीला भेट देणार आहेत.

अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण आंदोलनात पद्मनाभ शिष्य संप्रदायाचे पूर्व पिठाधीश्‍वर राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांनी गोव्याचे यशस्वी नेतृत्व केले होते, तसेच विद्यमान पिठाधीश्‍वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनीही श्रीराम मंदिर निर्माण आंदोलनाला अनुसरून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर विविध सभा, बैठका आदींच्या माध्यमांतून जागृतीपर उपक्रमांचे यशस्वी नेतृत्व केले आहे. या कार्याची नोंद घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत ३१ जानेवारी या दिवशी श्रीक्षेत्र तपोभूमीला भेट देणार आहेत. या वेळी सरसंघचालक मोहनजी भागवत राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांच्या समाधीस्थानी पुष्पांजली अर्पण करणार आहेत, तसेच धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेणार आहेत, अशी माहिती श्री दत्त पद्मनाभ पिठाचे संचालक रामचंद्र नाईक यांनी दिली.