लोकांना प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मण सवदी यांचे वक्तव्य ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

(म्हणे), ‘मुंबई कर्नाटकची असून त्यावर आमचा अधिकार आहे !’ – लक्ष्मण सवदी, उपमुख्यमंत्री, कर्नाटक

लक्ष्मण सवदी

मुंबई – बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील बोरागमना गावातील बसस्थानकाचे उद्घाटन करतांना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी ‘मुंबई कर्नाटकची आहे. मुंबई आमची आहे. आमचा मुंबईवर अधिकार आहे. आम्ही त्याची मागणी करण्यास प्रारंभ करू. कर्नाटकात मुंबई जोडावी यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहे’, असे वक्तव्य केले होते. याचा समाचार घेतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कर्नाटकमधील लोकांना प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मण सवदी यांनी ‘मुंबई कर्नाटकची आहे’, असे विधान केले आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक संदर्भातील महाराष्ट्र सरकारची भूमिका ठामपणे मांडली. विवादित भाग हा केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी त्यांनी केली. लक्ष्मण सवदी यांच्या मागणीत काही तारतम्य नाही. २ राज्यांतील सीमाभागाविषयी काही आक्षेप असेल, तर त्यात केंद्र सरकारने मध्यस्थी करणे आवश्यक आहे, तसेच या प्रश्‍नावरही तोडगा केंद्र सरकारने काढला पाहिजे. कर्नाटक सरकारने सीमा भागात फेररचना करून कानडी गावे जाणूनबुजून मराठी भाषिक मतदारसंघात टाकली आहेत, असा आरोप त्यांनी केला.