जिल्हा मुख्यालयातील प्रजासत्ताकदिन सोहळा
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मी सदैव तत्पर आणि कटीबद्ध रहाणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हा मुख्यालय येथील पोलीस कवायत मैदान (परेड ग्राऊंड) येथे २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा झाला. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री बोलत होते.
या वेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्याच्या पर्यटनाला अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठीच जिल्ह्यात चिपी विमानतळ लवकरच चालू होत आहे. जिल्ह्यात ताज हॉटेलसारखे पंचतारांकित हॉटेल प्रकल्प येणार आहेत. कोरोनाच्या कठीण काळातही जिल्हावासियांनी नियमांचे योग्य पालन करून प्रशासनास साथ दिली आहे. त्यासाठी मला जिल्हावासियांचे कौतुक आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना, दुसर्या टप्प्यात पोलीस अन् महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना आणि तिसर्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना (कोरोना प्रतिबंधक) लस देण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता लस घ्यावी.
ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्याच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, तसेच उल्लेखनीय कामगिरी करणारे कर्मचारी, खेळाडू आदींचा सत्कार करण्यात आला.