नगरसेवकांकडून कामचुकार अधिकार्यांवर कारवाईची मागणी
यातून कोट्यवधी रुपये वाया गेले असेच झाले. संबंधितांची चौकशी करून तात्काळ कारवाई होणे अपेक्षित !
पिंपरी – शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये व्यय करूनही नद्यांचे प्रदूषण न्यून होत नसल्याचे समोर आले आहे. नदीपात्रामध्ये राडारोडा टाकून तेथील झाडे तोडली जात आहेत. काही ठिकाणी सांडपाणी वाहिन्या फुटल्याने त्यातील सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळत आहे. अनेक ठिकाणी जलपर्णी वाढली असल्याने नदी प्रदूषणात वाढ होत आहे. याविषयी विचारणा केल्यावर पर्यावरण विभागाचे अधिकारी माहिती देत नाहीत. (पर्यावरण अधिकार्यांनी माहिती न देणे अत्यंत चुकीचे आहे. स्वतःच्या चुकीमुळे माहिती देण्यास टाळाटाळ करत असतील, तर अशा अधिकार्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. नगरसेवकांनी हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा, ही अपेक्षा आहे. – संपादक) त्यामुळे महापालिका सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पर्यावरण विभागाला जाब विचारला. शहराचा सद्यस्थिती पर्यावरण अहवाल ऐनवेळी प्राप्त झाल्याने पुढील सभेपर्यंत संबंधित विषयाला स्थगिती देण्यात आली. सभेच्या वेळी नगरसेवकांनी जैवविविधता व्यवस्थापन समितीला काही अधिकार असतील तर ते बरखास्त करा अन्यथा कामचुकार अधिकार्यांवर कारवाई करा, अशीही मागणी केली.