रेडी गावात रोजगार निर्मितीच्या मागणीसाठी २६ जानेवारीपासून उपोषण करण्याची ग्रामस्थांची चेतावणी

प्रशासन ग्रामस्थांचे रोजगाराचे प्रश्‍न सोडवत नाही; म्हणून स्थानिकांना अशा मागण्या कराव्या लागतात !

वेंगुर्ला – तालुक्यातील रेडी गावातील बंद पडलेल्या ‘टाटा मेटॅलिक्स’ कारखान्याच्या जागी रोजगार निर्मिती करणारा प्रकल्प शासनाने न आणल्याने २६ जानेवारीपासून सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन रेडी ग्रामपंचायतीच्या वतीने सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना देण्यात आले आहे. या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, ग्रामपंचायत सदस्य शैलेश तिवरेकर, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम राणे आदी उपस्थित होते.

या निवेदनात असे म्हटले आहे की, रेडी गावात वर्ष १९९१ मध्ये चालू झालेला ‘टाटा मेटॅलिक्स’ हा पिग आयर्न उत्पादित करणारा प्रकल्प वर्ष २०१२ मध्ये कच्च्या मालाअभावी पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे रेडीसह जिल्ह्यातील सहस्रो लोक बेरोजगार झाले. या प्रकल्पावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, वाहतूक व्यवसायिक यांच्या व्यवसायावर मंदी आली आहे. बंद झालेल्या प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे १०० एकरचे क्षेत्र असून जवळच कनयाळ तलाव आहे. हा प्रकल्प पूर्ववत चालू होणे किंवा त्या ठिकाणी नवीन प्रकल्प चालू होण्याविषयी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही काही निर्णय झाला नाही. त्यामुळे गावातील लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.