कोणत्याही अफवांना बळी पडू नका ! – पंतप्रधान मोदी

देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला उत्साहात प्रारंभ ! 

नवी देहली – आपले शास्त्रज्ञ आणि तज्ञ यांना जेव्हा स्वदेशी लसीची सुरक्षितता अन् परिणामकारकता यांविषयी निश्‍चिती झाली, तेव्हाच त्यांनी या लसींच्या आपत्कालीन वापरास अनुमती दिली. त्यामुळे देशवासियांनी कोणत्याही भूलथापा, अफवा आणि अपप्रचार यांपासून सावध रहावे. भारतातील लस निर्मिती करणारे शास्त्रज्ञ, वैद्यकीय प्रणाली आणि भारतातील प्रक्रिया यांवर संपूर्ण जगाला विश्‍वास आहे. आपण हा विश्‍वास आपल्या पूर्वीच्या कामांपासून संपादित केला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. ते कोरोनासाच्या लसीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन करतांना बोलत होते.

या लसीवरून विरोधी पक्षांनी शंका उपस्थित केल्यामुळे मोदी यांची हे प्रत्युत्तर दिले.

कोरानाची लस देतांना परिचारीका (प्रतिकात्मक चित्र)

मोदी पुढे म्हटले की, प्रत्येक भारतियाला या गोष्टीचा अभिमान वाटेल की, जगातील अनुमाने ६० टक्के लहान मुलांना जे जीवनरक्षक डोस दिले जातात, ते भारतात निर्माण होतात. भारतातील कठीण शास्त्रीय प्रक्रियेतून ते सिद्ध होतात. भारतीय लसी परदेशी लसींच्या तुलनेत फार स्वस्त असून त्याचा उपयोग करणेही सोपे आहे. विदेशात काही लसी अशा आहेत, ज्यांचा एक डोस ५ सहस्र रुपयांना मिळतो आणि त्यांना उणे ७० डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या शीतकपाटात ठेवावे लागते.