वादग्रस्त गोवा पालिका दुरुस्ती विधेयकासमवेत एकूण ५ शासकीय विधेयके अधिवेशनात मांडली जाणार
पणजी, १५ जानेवारी (वार्ता.) – २५ ते २९ जानेवारी या कालावधीत गोवा विधानसभेचे ४ दिवसीय अधिवेशन होणार आहे. २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन असल्याने या दिवशी विधानसभेचे कामकाज होणार नाही. ‘विधीमंडळ कामकाज सल्लागार समिती’ने (बीएसी) हा निर्णय घेतला असल्याची माहिती विधीमंडळ कामकाज मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, ‘‘कोरोना महामारीमुळे विधानसभेच्या कामकाजाचे दिवस घटवून हे एधिवेशन ४ दिवसांचे करण्यात आले आहे. अधिवेशनाला २५ जानेवारी या दिवशी प्रारंभ होणार आहे. अधिवेशनात ‘गोवा पालिका सुधारणा विधेयक’, ‘गोवा मोटर वाहन दुरुस्ती विधेयक’, ‘गोवा रेग्युलेशन ऑफ हाऊस बिल्डींग अॅडवान्स बिल’, ‘गोवा नॉन बायोडिग्रेडेबल गार्बेज कंट्रोल अमेंडमेंट बिल’ आणि ‘गोवा फिस्कल रिसपॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट बिल’, ही शासकीय ५ विधेयके मांडली जाणार आहेत. २० जानेवारी या दिवशी होणार्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर अजूनही काही विधेयके अधिवेशनात मांडण्याचा निर्णय होऊ शकतो. अधिवेशन काळात प्रतिदिन ३ लक्षवेधी सूचना घेण्यात येणार आहेत. शासनाला राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झालेली पाहिजे; परंतु कोरोना महामारीमुळे कामकाजाचा कालावधी घटवावा लागत आहे.’’
अधिवेशनासाठी ७५१ प्रश्न आले आहेत आणि यामधील १९५ प्रश्न तारांकित आहेत. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी यानंतर मार्चमध्ये होणार्या अधिवेशनाचा कालावधी घटवू नये, अशी मागणी शासनाकडे केली आहे.