मुंबई – राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लसींचे वाटप केले जात आहे. केंद्र शासनाने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या सुधारित केली असून राज्यातील ३५८ केंद्रांच्या माध्यमातून पहिल्या दिवशी अनुमाने ३५ सहस्र आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण करण्यात येईल. राज्यात सर्वाधिक केंद्र मुंबईत (५०) असून त्या पाठोपाठ पुणे (३९), ठाणे (२९) या शहरांमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. मुंबईसाठी १ लाख ३९ सहस्र ५००, तर पुणे येथे १ लाख १३ सहस्र डोस वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १३ जानेवारी या दिवशी दिली.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात अनुमाने ८ लाख आरोग्य कर्मचार्यांची नोंदणी झाली असून त्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. १६ जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईतील कुपर रुग्णालय या २ ठिकाणी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून पंतप्रधान संवाद साधतील.