‘बार्क’चे माजी अधिकारी दासगुप्ता मुख्य सूत्रधार ! – पोलिसांचा आरोप

 टी.आर्.पी. घोटाळा प्रकरण 

पार्थ दासगुप्ता

मुंबई – ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता हे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टी.आर्.पी.) घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. पार्थ यांनी एआर्जी आउटलायर आस्थापनाचे संचालक आणि रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्यासह संगनमताने कट रचत टी.आर्.पी. घोटाळा केल्याचा आरोप मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुरवणी आरोपपत्राद्वारे ठेवला. या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी १२ आरोपींविरोधात याआधी आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले होते.


११ जानेवारी या दिवशी पार्थ यांच्यासह ‘बार्क’चे माजी मुख्य परिचलन अधिकारी रोमील रामगडिया आणि एआर्जी आउटलायर आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांच्या विरोधात गुन्हे शाखेने ३ सहस्र ६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र सादर केले. दासगुप्ता आणि रामगडिया यांची संशयास्पद कृती लक्षात आल्यानंतर ‘बार्क’ने स्वतंत्र आस्थापनाच्या माध्यमातून टीआर्पी मोजणीचे फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले. त्याचा अहवाल आरोपपत्रात प्रमुख पुरावा म्हणून जोडण्यात आला आहे.

वृत्तवाहिन्यांसमवेत सर्वसाधारण मनोरंजन वाहिन्या आणि क्रीडा वाहिन्या यांनीही टी.आर्.पी. वाढवण्यासाठी गैरमार्ग अवलंबल्याची माहिती पुढे आल्याचा दावा गुन्हे शाखेने केला. अशा १२ ते १३ वाहिन्या असून त्याविषयी तपास चालू करण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.