सोलापूर येथील श्री सिद्धरामेश्‍वर मंदिराच्या परिसरात जमावबंदीचा आदेश

  • कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यात्राकाळासाठी प्रशासनाचा निर्णय

  • मानकर्‍यांसह ५० जणांना अनुमती

सोलापूर, १० जानेवारी – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा प्रथमच ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर मंदिर परिसरात यात्राकाळात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ११ जानेवारीच्या रात्री १२ वाजल्यापासून ते १६ जानेवारीपर्यंत हा आदेश मंदिर परिसर, ‘होम मैदान’ या ठिकाणी लागू असणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे होणारी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांची यात्रा यंदा केवळ ५० भाविकांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हा निर्णय घोषित केला. जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस आयुक्त डॉ. वैशाली कडूकर, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते.

यात्राकाळात केवळ पासधारक भाविकांनाच धार्मिक विधीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येईल. लोकप्रतिनिधी आणि अतीमहनीय व्यक्ती यांनाही यात्राकाळात प्रवेश देण्यात येणार नाही. ग्रामीण भागातून यात्रेसाठी भाविकांनी शहरात येऊ नये यासाठी शहर आणि ग्रामीण पोलीस यांंच्या संयुक्त पथकांद्वारे शहराभोवती नाकाबंदी करण्यात येणार आहे, तसेच अन्य जिल्ह्यांतून भाविक सोलापूर जिल्ह्यात येऊ नयेत, यासाठी जिल्ह्याच्या सीमेवरही सर्वत्र नाकाबंदी असणार आहे, असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.