संभाजीनगर – ‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याच्या मागणीवरून उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर आनंद झाला. येत्या २३ जानेवारी या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जयंती दिवशी ‘औरंगाबाद’चे नाव ‘संभाजीनगर’ करावे ही विनंती, असे शिवसेना नेते आणि माजी खासदार चंदक्रांत खैरे यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा संभाजीनगर नामांतराला विरोध नाहीच. काँग्रेसही विरोध करणार नाही. या सूत्रावरून आघाडीमध्ये काहीही मतभेद होणार नाहीत. मध्यवर्ती निवडणुका तर शक्य नाही. एम्.आय.एम्.च्या विरोधाला आम्ही घाबरत नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना मी ‘औरंगाबाद’चे नाव ‘संभाजीनगर’ करण्यात यावे, यासाठी ४ स्मरण पत्रे त्यांना पाठवली होती. त्यांची उत्तरेही आली आहेत.