सातारा येथे भुयारी रस्त्यावरील नामफलक फाडल्याने तणाव

कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करताना पोलीस

सातारा – सातारा शहरात ८ जानेवारी या दिवशी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भुयारी रस्ता (ग्रेड सेपरेटर) खुला करत असल्याचे जाहीर केले. दिवसभर त्यातून वाहतूक चालू होती. यातील प्रत्येक रस्त्याला नावे देण्यात आली आहेत; मात्र ९ जानेवारीच्या पहाटे नामफलक फाडल्याचे समोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर छत्रपती उदयनराजे यांचे विश्‍वासू नगरसेवक दत्ता बनकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कोणताही गाजावाजा न करता, कोणालाही पूर्वकल्पना न देता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बहुचर्चित आणि ऐतिहासिक अशा भुयारी रस्त्याचे (ग्रेड सेपरेटरचे) स्वत:च उद्घाटन आणि लोकार्पण करून सातारकरांना सुखद धक्का दिला. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून आणि परिश्रमातून भुयारी रस्त्याची निर्मिती झाली. या कामाच्या संमतीपासून ते पूर्णत्वापर्यंत त्यांनी पूर्ण लक्ष घातले होते. काम पूर्ण झाल्याने भुयारी रस्ता लवकर चालू करावा, अशी मागणीही होत होती. भुयारी रस्ता चालू करण्याची प्रशासनाकडून सिद्धता चालू होती. तेव्हा छत्रपती उदयनराजे यांनी सातारा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना रस्त्याच्या कामाची पहाणी करण्यासाठी ८ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजता बोलावले. शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला त्यांनी पुष्पहार अर्पण करून भुयारी रस्त्याचे उद्घाटन केलेे. तसेच फीत कापली.

औरंगाबादच्या नाव पालटायचे कि नाही, याचा लोकच निर्णय घेतील !

छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे केवळ महाराज होते म्हणून ते ओळखले जात नव्हते; तर कार्यकर्तृत्वामुळे आणि लोकहिताच्या निर्णयामुळे ते ओळखले जात होते. ज्याप्रमाणे बॉम्बेचे मुंबई झाले. त्याप्रमाणे पूर्वीपासून असलेल्या औरंगाबादविषयी नाव पालटायचे कि नाही, याचा लोकशाहीमध्ये लोकभावनेनुसार लोकच निर्णय घेतील. नामांतर करतांना कोणाचीही मानहानी होऊन उद्रेक होणार नाही, याचा प्रत्येकाने सविस्तर विचार केला पाहिजे.