यवतमाळ, ६ जानेवारी (वार्ता.) – जगभरामध्ये हिंदु धर्माची होत असलेली हानी थांबवण्यासाठी, तसेच धर्म, संस्कृती, हिंदु राष्ट्र यांच्या विचारांंच्या प्रसारासाठी सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ जानेवारी या दिवशी विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन सोशल मीडिया प्रगत प्रशिक्षण’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यातील धर्मप्रेमींनी घेतला.
शिबिराला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पूजनीय अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी ते म्हणाले, ‘‘धर्मप्रसारासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक कृती करतांना साधना म्हणून ईश्वराचे साहाय्य घ्यावे. शास्त्र समजून कार्य करावे. हिंदु समाज विभागाला आहे, त्यामुळे संघटन होण्यासाठी साधनेचे महत्त्व लक्षात घेऊन गुरुकृपायोगानुसार साधना करावी.’’
शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. निलेश टवलारे आणि श्री. प्रफुल टोंगे यांनी फेसबूक, ट्विटर यांविषयी तांत्रिक माहिती देऊन उपस्थित शिबिरार्थ्यांचे शंकानिरसन केले. ‘देवतांचे विडंबन थांबवण्यासाठी सनदशीर मार्गाने विरोध कसा करायचा ?’, याविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी माहिती दिली, तर सोशल मीडियाचा वापर करतांना माहीत असायला हव्यात अशा कायदेविषयक सूत्रांची माहिती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी दिली.