सोलापूर येथील शाळकरी मुलांकडून १० दुचाकी वाहने जप्त

सोलापूर – येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या ‘डीबी’ (डिटेक्टिव्ह ब्रँच) पथकाने १२ वर्षांच्या शाळकरी मुलांकडून १० दुचाकी वाहने जप्त केली. ही मुले शहरातील झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास होती. या मुलांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. ही मुले येथे दुचाकी वाहनावरून जात होती. पथकाने त्यांच्याकडे वाहनाची कागदपत्रे मागितली असता वाहन चोरीचे असल्याचे समोर आले. मुलांना दुचाकीवरून फिरण्याची हौस होती. त्यामुळे ते शहरात विविध चौकांत लावलेली वाहने चोरत होते. ही मुले कुणालाही संशय येऊ नये यासाठी वाहनामध्ये पेट्रोल असेपर्यंत वाहन चालवत असत आणि पेट्रोल संपल्यानंतर एखाद्या निर्जनस्थळी सोडून जात असत.(यातून समाजात चोरी करून स्वत:ची हौस भागवण्याची घातक मनोवृत्ती पसरत आहे, हे धर्मशिक्षणाच्या अभावाचेच फलित आहे. यातून धर्मशिक्षणाची आवश्यकताही लक्षात येते. – संपादक)